महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत पनवेलमध्ये रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन

 अलिबाग,दि.02 (जिमाका):- महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रायगड व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन दि.04 ते 06 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वेळेत गुजराती शाळा, डॉ.आंबेडकर रोड, जुने पनवेल येथे करण्यात आले आहे.

तांदूळ, कडधान्य व भाजीपाला विक्री दालने, सेंद्रीय शेतकरी गटांची शेतमाल विक्री, महिला बचत गट उत्पादने-मसाला,पापड, लोणची इ. प्रदर्शन व विक्री तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान परिसंवाद व चर्चा सत्र, शेतकरी उत्पादक ग्राहक परिसंवाद त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रसार ही या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

या महोत्सवात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून खरीप हंगामात विविध योजनेंतर्गत भात पीक प्रात्यक्षिकामधून उत्पादित झालेले लाल, काळा, जांभळा भात तसेच इतर सुवासिक- इंद्रायणी, बारीक जातीच्या-वाडा कोलम, शुभांगी वाय एस आर इ. तांदळाची थेट शेतकऱ्यांकडून योग्य दरात ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच रब्बी हंगामात उत्पादित कडधान्य तसेच भाजीपालाही थेट शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेले विविध जातींचे तांदूळ, भाजीपाला, कंदमुळे, कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विविध महिला बचतगटांची उत्पादने व त्यांचे प्रदर्शनही ग्राहकांसाठी या महोत्सवात प्रमुख आकर्षण असणार आहे. या महोत्सवात भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी पनवेल शहर व परिसरातील सर्व ग्राहक तसेच शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित महोत्सवात सहभागी होऊन विकेल ते पिकेल-थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पना साखळी विकसित करावी व जास्तीत जास्त शेतकरी उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे. 

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज