"विकासाची पंचसूत्री" कार्यक्रमांतर्गत राज्याचा अर्थसंकल्प सादर



 ‘विकासाची पंचसूत्री’ कार्यक्रम राज्यास विकासात मोलाची भूमिका बजावणार

-पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 


अलिबाग,दि.11(जिमाका):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेमध्ये केलेल्या भाषणामध्ये पृथ्वी,जल,अग्नी, वायू आणि आकाश पंचतत्वांप्रमाणे राज्याच्या विकासामध्येही कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या प्रक्रीयेतील महत्त्वाच्या पाच घटकांचा समावेश असणारा ‘विकासाची पंचसूत्री’ या अंतर्गत राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला.

2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प ‘विकासाची पंचसूत्री’ कार्यक्रमानुसार रायगडसह कोंकणातील जैवविविधता दर्शविणारे उद्यान रायगड जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. थोर अर्थतज्ज्ञ पद्मविभूषण डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मौजे जामगाव, ता.रोहा येथे डॉ. चिंतामणराव देशमुख् जैवविविधता वन व वनस्पती उद्यान उभारणीची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित दादा पवार यांनी आज अर्थसंकल्पाच्या भाषणात केली.

रायगड जिल्ह्यात भुवनेश्वर ता. रोहा येथे महिला व नवजात शिशू रुग्णालयांचे काम लवकर हाती घेण्यात येणार आहे. रायगड किल्ला व परिसर जतन व संवर्धनासाठी 100 कोटी देण्यात आले आहेत. सुधागड किल्ला सवंर्धनासाठी 14 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यासह व कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी रेवस -रेड्डी सागरी महामार्गासाठी भरीव निधी देण्यात येणार आहे. अष्टविनायक गणपती मंदिरांच्या विकास आराखड्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच कोंकण विभागात कौशल्य विकास व उद्योजकता अंतर्गत इनोव्हेशन हब स्थापण्यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचे यावेळी आपल्या भाषणात नमूद केले.

सन 2022-23 च्या अर्थसंकल्पानुसार कोकण कृषी विद्यापीठास 50 वर्षे पूर्ण होत असल्याने संशोधनाकरिता प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. कृषी निर्यात धोरणानुसार निर्यातक्षम विविध 21 शेतमालांचे जिल्हानिहाय क्लस्टर तयार करून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रशिक्षणाद्वारे सेंद्रिय व पारंपारिक तसेच जी.आय. टॅग प्राप्त कृषीमाल निर्यातीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 50 कोटी रुपयांनी वाढवून किनारी भागातील मासळी उतरविणाऱ्या 173 केंद्राची देखभाग व दुरुस्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

दळणवळाच्या सुविधांमध्ये भर देतांना पनवेल-विरार या नवीन रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य शासनाकडून आर्थिक सहभाग देण्याबाबतचा प्रस्ताव विचराधीन आहे. आर्थिक मंदीतही मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.00 अंतर्गत 1 लाख 89 हजार कोटींच्या गुंतवणूकीतून 3 लाख 30 हजार नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत. कोकणात किनारपट्टीवर येणारी चक्रीवादळे व अन्य नैसर्गीक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी 3 वर्षे कालावधीचा 3 हजार 200 कोटी रुपयांचा आपत्ती सौम्यिकरण कार्यक्रम मंजूर केला आहे. त्यानुसार धूप प्रतिबंधात्मक बंधारे, भूमिगत विद्युतवाहिन्या, बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे, पूर्वसूचना प्रणाली व दरडप्रवरण क्षेत्रांत प्रतिबंधात्मक कार्ये हाती घेण्यात येत आहेत.

राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगिण विकास साधण्याच्या हेतूने या अर्थसंकल्पातून सादर करण्यात आलेल्या ‘विकासाची पंचसूत्री’ कार्यक्रम राज्यास विकासाच्या पुढील वाटेवर नेण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक