जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते माणगाव तहसिल कार्यालय येथे “गरुडझेप” स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन अभ्यासिकेचे उद्घाटन
अलिबाग, दि.10 (जिमाका):- जिल्हाधिकारी
डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “गरुडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन” केंद्रांतर्गत दि.09 मार्च 2022 रोजी
माणगाव तहसिल कार्यालय येथे अभ्यासिकेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या
हस्ते पार पडले.
या अभ्यासिकेच्या
माध्यमातून सर्व महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना
विविध पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच ही अभ्यासिका पूर्ण आठवडाभर 24 तास
सुरु राहणार असल्याबाबत जाहीर करण्यात आले.
या कार्यक्रमास
माणगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रशाली जाधव-दिघावकर, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी
श्री.अमित शेडगे, माणगाव तहसिलदार प्रियांका आयरे, तळा तहसिलदार श्री.ए.एम.कलशेट्टी
तसेच माणगाव तालुक्यातील इतर अधिकारी वर्ग आणि द.म.तटकरे महाविद्यालयातील प्राध्यापक
श्री.बबन शिनगारे व विद्यार्थी, नागरिक, पत्रकार हजर होते.
तसेच जिल्हाधिकारी
डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आगमनाचे औचित्य साधून महाराजस्व अभियान कातकरी उत्थान
अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत
आदिवासी बांधवांना मोफत 7/12 वाटप, घरठाण मंजूर प्रकरणी 7/12 वाटप, वनहक्क मंजूर दावे
7/12 वाटप, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना लाभ मंजूर धनादेश वाटप, जातीचे दाखले,
शिधापत्रिका वाटप तसेच कृषी विभाग व पंचायत समिती माणगाव यांच्याकडील लाभार्थ्यांना
विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी
डॉ.कल्याणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणगाव
उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन माणगाव तहसिलदार
प्रियांका आयरे यांनी केले.
या कार्यक्रमास
माणगाव तालुक्यातील विद्यार्थी, नागरिक तसेच आदीम कातकरी बांधव व भगिनींची मोठ्या प्रमाणात
उपस्थिती होती.
00000
Comments
Post a Comment