जग जिंकायचं असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

 


अलिबाग, दि.30 (जिमाका):- आपल्याला जग जिंकायचं असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत. समोर आलेल्या अडचणींवर आत्मविश्वासाने मात करून विकासाकडे वाटचाल करायला हवी आणि यासाठी मी सदैव तुमच्या सोबत असेन, आपण सर्वजण एकत्र काम करू, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज लोणेरे येथे केले.

लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरातील इन्‍क्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमीपूजन पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार श्री.सुनिल तटकरे, आमदार श्री.अनिकेत तटकरे, आमदार श्री.भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार योगेश कदम, आमदार प्रकाश सुर्वे, किशोरभाई जैन, मुंबई इमारत सुधार व पुर्नरचना मंडळाचे अध्यक्ष श्री.विनोद घोसाळकर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरु प्रा.डॉ.कारभारी काळे, कुलसचिव प्रा.डॉ.भगवान जोगी व इतर मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची राजधानी रायगडाचा पायथा तर दुसरीकडे या विद्यापीठाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर. एकीकडे स्वराज्य दाखविलेला तर दुसरीकडे या देशाला संविधान दिलेले. या दोन्ही महापुरुषांच्या नावाशी जोडलेले हे तांत्रिक विद्यापीठ आहे. हे महाविकास आघाडीचे शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तरुणांसाठी, महाराष्ट्रासाठी जे काही चांगले असेल ते अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करीत आहे. कुठल्याही कॉलेजमध्ये राजकारण होऊ नये पण ते राजकारण चांगल्यासाठी असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र शिक्षण व्यवस्थेची स्थिती सुधारावी म्हणून सर्वोतोपरी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत. आजच्या काळात भारतासाठी महत्त्वाचे म्हणजे येथे मोठ्या संख्येने असलेला युवावर्ग. या युवावर्गाला शिक्षण चांगले पाहिजे, चांगला रोजगार मिळाला पाहिजे, तो सहज उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याबरोबरच चांगले आरोग्यही मिळाले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, शिक्षणाचे धोरण बदलत असताना त्यात आंतरराष्ट्रीयीकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर युवावर्गासाठी शिक्षणाबरोबरच शिक्षणानंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याचाच विचार करून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या मुला-मुलींना आपल्या एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये कसे समाविष्ट करून घेऊ शकतो, याचा आपण विचार करीत आहोत, त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय लवकरच घेण्यात येणार आहेत. युवावर्गाने रोज नवनवीन काय विचार करू शकता, मोठी स्वप्न काय बघू शकता, तुमची ताकद कशात आहे हे ओळखून तसा विचार झाला पाहिजे. केजी टू पीजी शिक्षण पद्धतीत आपण कशा प्रकारे अधिक सुधारणा करू शकतो याचा विचार व्हायला हवा.

ग्रामीण भागातील शाळेमध्ये देखील अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. आपल्या विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, फुटबॉल, हॉकीचे मैदान उपलब्ध करून द्यायला हवे, असे सांगून श्री.आदित्य ठाकरे म्हणाले की, माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी 2004 साली आपल्याला इंडिया 2020 आणि सुपर पॉवर होण्याचे स्वप्न दाखविले. त्यादृष्टीने आपण नक्की काय शिकतो व का शिकतो यावर लक्ष केंद्रीत केले तरच आपला देश पुढे जाऊ शकतो, हा विचार दिला. तरूण वर्गाने विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे विचार, कृती आत्मसात करून समृद्धीकडे वाटचाल करायला हवी. सोशल मिडीयाचा सकारात्मक उपयोग करून राज्याच्या अन् देशाच्या प्रगतीला हातभार लावायला हवा. ग्रामविकासाबरोबरच मानव विकासही तितकाच महत्वाचा आहे. आणि हा विकास शाश्वत विकास कसा होईल, यावर लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे.

आपल्याला जग जिंकायचं असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत. असलेल्या अडचणींवर मात करून विकासाकडे वाटचाल करायला हवी आणि यासाठी मी सदैव तुमच्या सोबत असेन. आपण एकत्र काम करू, असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण वर्षभरातच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण आणि आज या परिसरातील इन्क्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमीपूजन असे दोन कार्यक्रम या विद्यापीठामध्ये संपन्न झाले. राज्य शासनाकडे या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च याचा दर्जा मिळण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दिलेला आहे. पण नवीन प्रस्तावास मंजुरी न मिळाल्यामुळे राज्य शासनाकडे हा प्रस्ताव स्थगित आहे. तरी हा प्रस्ताव पुन्हा एकदा राज्य शासनाच्यावतीने केंद्र शासनाला पाठविण्यात यावा, अशी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने कु.तटकरे यांनी केली. असा दर्जा मिळाला आणि संबंधित अभ्यासक्रम सुरू झाला तर कोकण विभागामध्ये औषध निर्माण क्षेत्रामध्ये क्रांती निश्चितपणे घडू शकते. अभ्यासक्रमांमध्ये निश्चितपणे वाढ होऊ शकेल.

त्या पुढे म्हणाल्या, आज आपण अनुसूचित जातीजमाती वसतिगृहाचे भूमीपूजन केले त्याचबरोबर या परिसरामध्ये असणाऱ्या वसतिगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा परिसर मोठा आहे. येथे मोठ्या प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी शिक्षकांसाठी एक ट्रेनिंग सेंटर उभे केल्यास या भागातील शिक्षकांना प्रशिक्षणासाठी इतर ठिकाणी जावे लागणार नाही. अद्ययावत असे ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी उपलब्ध झाल्यास निश्चितपणे रायगड जिल्ह्यातील शिक्षकांनाही चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण मिळेल आणि रायगड जिल्ह्याचा शिक्षणाचा दर्जा निश्चितपणे उंचावू शकतो.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. तसेच आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा या ठिकाणी उभारला जावा. मात्र पुतळा उभारण्याची मागणी करीत असताना या दोन्ही महामानवांच्या विचारांचा वारसा हा रायगड जिल्ह्यातील युवकांनी जोपासावा. देशभरातून विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी शिकायला येतात. त्यांना छत्रपती शिवरायांचे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या जीवनामध्ये आत्मसात करता आले तर रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याचा जगाच्या पाठीवर नावलौकिक होईल. रायगड जिल्ह्यात फार्मा व लॉ कॉलेजचे प्रस्ताव मान्य करण्यात यावेत आणि त्याचे उद्घाटनही आदित्यजींच्याच हस्ते व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्री कु.तटकरे यांनी शेवटी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत म्हणाले की, या भागात अशा प्रकारचे विद्यापीठ व्हावे, ही माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांची इच्छा होती. त्यांनी हा परिसर शासनाच्या सहकार्याने विद्यापीठाकडे दिला. या विद्यापीठाच्या विकासासाठी प्रस्ताव सादर केल्याबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोवीस तासांमध्ये 20 कोटी रुपये मंजूर केले. वसतिगृह मंजूर केले. येत्या काळात येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 6 जून हा दिवस शिवराज दिन म्हणून साजरा करायचे ठरविले आहे. येत्या 06 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होईल आणि त्याचं अनावरण पुढच्या 06 जूनला या सगळ्यांच्या उपस्थितीत केले जाईल, असे सांगून श्री.उदय सामंत म्हणाले, या पुतळ्याच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद विद्यापीठाच्या बजेटमध्ये केलेली आहे आणि आणखी लागणारा संपूर्ण निधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात येईल. विद्यापीठाचे उपकेंद्र महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येत आहेत. या विद्यापीठाच्या परिसरात चांगल्या पद्धतीचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. ते कोकणातील सर्वात मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत शिक्षण सुविधा निर्माण करण्यासाठी तंत्र व शिक्षण विभाग सदैव प्रयत्नशील राहील, असे ते शेवटी म्हणाले.

खासदार श्री.सुनिल तटकरे यावेळी म्हणाले की, बॅरिस्टर अंतुले यांनी आपल्या रायगड जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी तंत्रशास्त्र विद्यापीठ असावे असे स्वप्न पाहिले. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहोत ते डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानामुळे. आम्हाला त्यांचा ‍अभिमान आहे. या विद्यापीठात राज्यातीलच नव्हे देशातीलच नव्हे तर जगभरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आले पाहिजे. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा येथे देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेले उच्च शिक्षण गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे. शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थिनींना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. या परिसरामध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भारत सरकारकडून काही बाबींची परवानगी हवी असेल, विभागामार्फत दिलेल्या प्रस्तावांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावयाचा असल्यास मी नक्की करेन, अशी ग्वाही देवून या विद्यापीठाचा परिसर मुंबई विद्यापीठासारखा अत्यंत चांगला कॅम्पस बनावा, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

यावेळी प्रास्ताविक करताना कुलगुरु प्रा.डॉ.कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली.

या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक