जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांची कर्त्यव्यपरायणता अन् एक यशस्वी शस्त्रक्रिया..!
अलिबाग, दि.01 (जिमाका):- आर्थिक
वर्षाचा दि.31 मार्च हा दिवस शेवटचा दिवस. या दिवशी सर्वच शासकीय
कार्यालयांप्रमाणे जिल्हा रुग्णालयातही सर्व विभागातील आर्थिक बाबीविषयक कामकाजाची
धावपळ सुरू होती. तसेच गुरुवार असल्याने अपंग प्रमाणपत्र वाटप करण्याचाही दिवस
होता. नेहमीपेक्षा या दिवशी कामाचा ताण थोडा जास्तच होता.
अशातच जिल्हा रुग्णालयामध्ये श्रीमती सुमित्रा पाटील, वय वर्षे 50, रा.रावे
ता.पेण या पोटदुखी व उलट्या होणे हा त्रास होत असल्याने सर्जरी ओपीडी मध्ये
तपासणीसाठी आल्या होत्या. त्यांची गंभीर परिस्थिती पाहून बाह्यरुग्ण विभागातील
डॉ.परजणे यांनी त्यांना तातडीने तपासले असता श्रीमती पाटील यांना अक्युट
अपेंडीसायटीसचा त्रास असल्याचे निदान झाले.
श्रीमती सुमित्रा पाटील यांची तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे
डॉ.परजणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना सांगितले. जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ.माने यांनी प्रसंगाची गांभीर्यता ओळखून आणि रुग्णाचा जीव वाचविणे
गरजेचे असल्याने तसेच ते स्वतः शल्यचिकित्सक असल्याने त्यांनी श्रीमती सुमित्रा
पाटील यांची शस्त्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल (दि.31
मार्च 2022) रोजी सायंकाळी 07.30 वाजता यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. श्रीमती
पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांना होणारा त्रासदेखील कमी झाला आहे.
या शस्त्रक्रियेदरम्यान सर्जन डॉ.परजणे, भूलतज्ञ डॉ.घाटे व अधिपरिचारिका
श्रीमती रोशनी या उपस्थित होत्या.
00000
Comments
Post a Comment