"किसान भागीदारी प्राथमिकता हमारी" मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील पंचायत राज दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC)उपलब्ध करण्याचे नियोजन
अलिबाग,दि.19 (जिमाका)
:- केंद्र शासनाने दि.06 फेब्रुवारी 2020 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या
सर्व पात्र लाभार्थ्याना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची मोहीम देशात
सुरू केली आहे. ही मोहीम भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष अंतर्गत आत्मनिर्भर
भारताचा एक भाग म्हणून देशात राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दि.24 एप्रिल
2022 रोजी पंचायत राज दिनाचे औचित्य साधून
राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पी.एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड
उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
यानुषंगाने केंद्र शासनाने दि.24 एप्रिल 2022 ते
दि.01 मे 2022 या कालावधीत "किसान भागीदारी प्राथमिकता हमारी" नावाची मोहीम
राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या
सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) उपलब्ध करून देण्याचे निर्देशही
दिले आहेत.
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालानुसार राज्यात
पी.एम.किसान नोंदणीकृत एकूण 114.93 लाख लाभार्थ्यांपैकी 89.36 लाख लाभार्थ्यांना किसान
क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. अद्यापही जवळपास 33.57 लाख पी.एम.किसान नोंदणीकृत
लाभार्थी हे किसान क्रेडिट कार्डधारक नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी दि.24 एप्रिल 2022 रोजी
राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पी.एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड
उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी
सविस्तर कार्यप्रणाली उपलब्ध करून दिलेली आहे. यानुसार किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध
करून देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली
महसूल, ग्रामविकास, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा
अग्रणी बँक यांच्या समन्वयाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरुन नोडल अधिकारी पी.एम.किसान तथा
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री.कुलकर्णी
व संबंधित उपनिबंधक,सहकार यांना जिल्ह्यातील तालुका व गावनिहाय पी.एम.किसान लाभार्थ्यांची
बँकखाते तपशिलासह यादी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संबंधित बँकांनी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून
देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन
दि.01 मे 2022 पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची पूर्ण करण्याचे निर्देश
देण्यात आले असून यासाठी जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील
संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची
आणि त्यांच्या पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारीत पेमेंटसाठी
अधिकृत करून घेण्याची कार्यवाही करण्यासाठी संनियंत्रण करावे, असेही सूचित करण्यात
आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांचे
जिल्हा व्यवस्थापक व कृषी विभागाच्या समन्वयाने दि. 24 एप्रिल 2022 रोजी आयोजित ग्रामसभेत
विमा योजनेविषयी लोकांना माहिती देण्यात येणार असून दि. 26 एप्रिल 2022 रोजी गावनिहाय
"पीक विमा पाठशाला" चे आयोजन करण्यात येणार आहे. या पाठशाळेमध्ये शेतकऱ्यांना
प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या
दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
तरी या विशेष ग्रामसभेचा लाभ जास्तीत जास्त ग्रामस्थांनी,शेतकऱ्यांनी
घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
किरण पाटील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे व जिल्हा अग्रणी बँकेचे
व्यवस्थापक श्री.कुलकर्णी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment