चालू वर्षी 01 जून ते 31 जुलै 2022 या कालावधीत मासेमारी बंदी घोषित

 

अलिबाग,दि.18 (जिमाका):- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) करण्याकरिता मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालू वर्षी दि.01 जून 2022 ते दि.31 जुलै 2022 (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केला आहे.

या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या वीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब / वादळी हवामानामुळे होणारी जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असून पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास/केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल, तसेच कलम 17 मधील तरतुदीन्वये जास्तीत जास्त दंडात्मक शिक्षा करण्यात येईल. दि.01 जून 2022 पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना दि.01 जून 2022 नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 अंतर्गत कारवाईस पात्र राहतील, असे सूचित करून सर्व मासेमारी नौका दि.31 मे 2022 वा तत्पूर्वी बंदरात पोहोचतील, याबाबत संबंधित नौकामालकांनी नोंद घ्यावी. तसेच या आदेशानुसार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत कोणतीही यांत्रिक मासेमारी नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही, याची संबंधितांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी आणि अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) श्री.एस.आर भारती यांच्याशी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय, तिसरा मजला, श्री सिद्धी अपार्टमेंट, डॉ.पुष्पलता शिंदे हॉस्पिटलच्या समोर, अलिबाग-पेण रोड, पिन-402201. दूरध्वनी क्रमांक:- 02141-295221 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) श्री.एस.आर भारती यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक