प्लास्टिक बंदीसाठी सरसावले काशीद.. जनजागृती अभियान संपन्न
अलिबाग, दि.18 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायती व अनेक स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगातून जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. “आम्ही” संस्था, मुंबई यांच्या वतीने काशीद बीचवर नुकताच प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती मेळावा संपन्न झाला.
यावेळी काशीद च्या सरपंच सौ.नम्रता कासार, मुरुडचे गटविकास अधिकारी श्री.सुभाष वाणी, “आम्ही” संस्थेच्या प्रमुख श्रीमती परेरा व श्रीमती किरण पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड म्हणाले, नागरिकांनी सवयी बदलून ओला व सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. प्लास्टिक नष्ट होत नाही, शिवाय प्लास्टिक खाल्ल्याने समुद्रातील मासे व जनावरेही मृत होतात, हे सर्व दुष्परिणाम आटोक्यात आणण्यासाठी काशीदचे ग्रामस्थ, “आम्ही” संस्था व पर्यटक यांच्या एकत्रित प्रयत्नातून प्लास्टिक बंदीचा उपक्रम यशस्वी करून काशीदचा वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत.
यावेळी “आम्ही” संस्थेच्या प्रमुख श्रीमती परेरा म्हणाल्या, प्लास्टिक संकलनासाठी “आम्ही” संस्थेतर्फे व्यावसायीकांना ओला व सुका कचरा संकलनासाठी दोन डस्टबिन दिल्या आहेत. तसेच आठवड्यातून तीन वेळा काशीद व नांदगाव या दोन ग्रामपंचायतींमधून किमान 6 हजार किलो सुका कचरा संकलन करून पुर्नप्रक्रियेसाठी पाठविला जातो. श्री.शहाजी जाधव यांनी प्लास्टिक चे दुष्परिणाम व “आम्ही” संस्थेतर्फे राबविण्यात आलेले उपक्रम याची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच सौ.नम्रता कासार यांनी ग्रामपंचायत प्लास्टिक बंदीसाठी कटिबद्ध असून ग्रामस्थांनीही कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याचे तसेच पर्यटकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या “चाकोरीच्या पलीकडे” ही माहिती पुस्तिका “आम्ही” संस्थेच्या प्रतिनिधी श्रीमती किरण पटेल व सरपंच सौ.नम्रता कासार यांना देण्यात आल्या.
ग्रामपंचायत कर्मचारी श्री.सुर्यकांत जंगम यांनी प्रास्ताविक केले. संवाद तज्ञ श्री.सुरेश पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष राणे, ग्रामसेवक श्री.अविनाश पिंपळकर, गट समन्वयक श्रीमती श्रेया गद्रे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment