समर्पित आयोगाच्या भेटीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन
अलिबाग, दि.20 (जिमाका):- नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी गठित समर्पित आयोग दि.25 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे भेट देणार आहे. या भेटीदरम्यान नागरिक, संस्थांची मते जाणून घेणार असून निवेदने स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगर पालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासठी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी हा समर्पित आयोग विभागनिहाय भेटी देणार आहे.
हा आयोग कोकण भवन येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी 02.30 ते 04.30 या वेळेत भेट देणार आहे. यावेळी नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी भेटीच्या दिनांकापूर्वी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून सामान्य शाखेतील लिपीक स्वप्नील कदम (मो. क्र.8237168789) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment