जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, गरीब कल्याण अन्न योजना, “एक देश एक रेशनकार्ड” योजनांची यशस्वी अंमलबजावणी
अलिबाग, दि.27 (जिमाका):- केंद्र शासनामार्फत सुरु असलेल्या योजनांबाबत पंतप्रधान
श्री.नरेंद्र मोदी हे मंगळवार, दि.31 मे 2022 रोजी लाभार्थ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे
संवाद साधणार आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला
योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, एक देश एक रेशनकार्ड योजना, या योजनांची
यशस्वीपणे अंमलबजावणी केली जात आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील सदस्यांना
मोफत गॅस जोडणी देण्यात येते. त्यामुळे लाकूडतोड कमी होवून पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास
मदत होईल. तसेच धूराचे प्रमाण कमी झाल्याने महिलांचे आरोग्य सुधारेल. या योजनेमध्ये
आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यातील 62 हजार 801 लाभार्थ्यांना मोफत गॅस जोडणी पुरविण्यात
आलेली आहे. तसेच मार्च 2022 अखेर रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 570 इष्टांक होता. रायगड
जिल्हयात एकूण 1 हजार 790 नवीन गॅस जोडणी देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे रायगड जिल्ह्यात
114% गॅस कनेक्शन पूर्ण झाले आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न
योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत कोविड-19 च्या प्रादूर्भावाच्या
काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत येणाऱ्या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य
कुटुंब योजनेतील पात्र लाभाथ्यांना दरमहा प्रति व्यक्ती 05 किलो अन्नधान्य मोफत दिले
जाते. त्यामुळे करोना काळात या योजनेमुळे गरीब गरजू व्यक्तींना मोठा आधार प्राप्त झाला
आहे. रायगड जिल्ह्यात 17 लाख 67 हजार 931 लाभार्थ्यांना दरमहा मोफत 05 किलो अन्नधान्य
मोफत देण्यात येते. ही योजना माहे एप्रिल 2020 मध्ये सुरु झाली असून माहे सप्टेंबर
2022 पर्यंत कार्यरत असणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही रास्त भाव दुकानातून
अन्नधान्य प्राप्त करून घेता येईल.
एक देश एक रेशनकार्ड योजना
भारतातील कोणत्याही राज्यातील नागरीक “वन नेशन वन रेशन कार्ड” या
योजनेद्वारे पोर्टेबिलिटीद्वारे कोणत्याही रास्त भाव धान्य दुकानातून अन्नधान्य प्राप्त
करुन घेवू शकतो. रायगड जिल्हयात दरमहा सुमारे 9 हजार ते 10 हजार लाभार्थी “वन नेशन वन रेशन कार्ड” योजनेचा
लाभ घेवून अन्नधान्य प्राप्त करून घेत असतात, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी
मधुकर बोडके यांनी दिली आहे.
00000
Comments
Post a Comment