प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या ई-पोर्टलद्वारे ऑनलाईन/धनाकर्षाद्वारे लाभार्थी हिस्सा भरावा
अलिबाग,दि.23 (जिमाका):- राज्यातील महाकृषी अभियानांतर्गत
प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी महाऊर्जाच्या
ई-पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एस.एम.एस. द्वारे
कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी ऑनलाईन/धनाकर्षाद्वारे लाभार्थी
हिस्सा भरावयाचा असल्यास ई-पोर्टलवर धनाकर्षाची (डिमांड ड्राफ्ट) प्रत अपलोड करुन नजीकच्या
महाऊर्जाच्या कार्यालयास भेट देऊन जमा करावा.
जिल्ह्यातील सौर कृषी पंपाचा सर्वसाधारण
लाभार्थी कोटा संपल्यानंतर काही सर्वसाधारण गटातील शेतकरी अनुसूचित जाती/ अनुसूचित
जमातीच्या घटकांमधून चुकीचे जातीचे प्रमाणपत्र ई-पोर्टलवर अपलोड करुन अर्ज सादर करीत
आहेत. संबंधित अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित लाभार्थी अनुसूचित
जाती/ अनुसूचित जमातीच्या घटकांमधील नसून सर्वसाधारण लाभार्थी म्हणून लाभार्थी हिस्सा
भरण्यासाठी महाऊर्जाच्या संबंधित विभागीय कार्यालयामध्ये भेट देऊन अर्ज स्विकारण्यासाठी
तगादा लावत आहेत.
तेव्हा सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांनी,
अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या घटकांचा लाभार्थी म्हणून सौर कृषी पंपाची ई-पोर्टलवर
चुकीचे जातीचे प्रमाणपत्र अपलोड करुन नोंद केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात
येईल. राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांस ई-पोर्टलवर अर्ज करण्यास, लाभार्थी हिस्सा भरण्यास
व इतर अंमलबजावणी संदर्भात अडीअडचणी असल्यास महाऊर्जाच्या खालील दूरध्वनी क्रमांकावर
कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत संपर्क साधावा. या योजनेंतर्गत
लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची सुधारित अंतिम मुदत दि.31 मे, 2022 पर्यंत वाढविण्यात
येत आहे याची नोंद घेवून लाभार्थ्यांनी दि.31 मे, 2022 पर्यंत लाभार्थी हिस्सा जमा
करावा, असे महाऊर्जा कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
पीएम-कुसुम योजनेंतर्गत 50 हजार सौर कृषी पंप
आस्थापित करण्याचे सद्य:स्थितीत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून अहमदनगर, औरंगाबाद,
बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड,
परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तसेच अकोला,
अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी,
सांगली, सातारा, सिंधुदूर्ग, ठाणे व वर्धा या जिल्ह्यांमध्ये सौर कृषीपंप उपलब्ध असून
लाभार्थ्यांनी
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या
संकेतस्थळावर नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी मुख्यालय दूरध्वनी क्रमांक
- 020-35000456, 020-35000450 येथे संपर्क साधावा, तसेच विभागीय कार्यालय, मुंबईच्या
कार्यक्षेत्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी
9021219479, (022)-49685584 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महासंचालक, महाऊर्जा
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment