जिल्हा परिषदेच्या शाळांमधून 15 जूनपासून होणार "शाळा प्रवेशोत्सव" साजरा

 

अलिबाग,दि.13 (जिमाका):- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी 06 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग शिक्षण विभागाकडून दि.15 जून 2022 रोजी शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात दि.15 जून 2022 रोजी सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये प्रवेशीत होणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

शाळापूर्व दिवशी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन होणार आहे. प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेश पात्र बालकाची यादी लाऊडस्पीकरवर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचतगट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वाच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेचा परिसर गावकऱ्यांच्या सहाय्याने स्वच्छ करून सडा-रांगोळी व पानाफुलांनी सुशोभित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षक शाळेत उपस्थित राहणार आहेत. बालकांची प्रभातफेरी काढण्यात येणार असून पुस्तक दिन साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थी वर्षभर 100% उपस्थित राहण्यासाठी, एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नसल्याची प्रतिज्ञा देण्यात येणार असून 100% उपस्थितीसह वर्गाध्यापनास प्रारंभ होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूम्स, कृतीयुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावादी उपक्रम, याचबरोबर मूल्य शिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, 100% प्रशिक्षित उच्च शिक्षित शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती, संगणक शिक्षण या सुविधांचा लाभ दिला जातो.

तरी दि.15 जून 2022 रोजी 06 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याचे तसेच दि.15 जून 2022 रोजी साजरा होणाऱ्या प्रवेशोत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज