कोणत्याही आपत्तीला धैर्याने सामोरे जावे - प्रांताधिकारी प्रशांत ढगे; मुरुड येथे आपत्ती व्यवस्थापन शिबीर संपन्न


 

अलिबाग, दि.08 (जिमाका):- मुरुड तालुक्यात पावसाळ्यात दरडग्रस्त, पूराचे पाणी येणाऱ्या गावांमध्ये अचानक आपत्ती आल्यास गावात व परिसरात असलेले जेसीबी, ट्रॅक्टरचे मालक व समाजसेवकांचे मोबाईल क्रमांक आपल्याजवळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत तुम्ही सक्षम राहू शकता, जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून मदत पोहोचण्याच्या अगोदर तुम्ही मदतकार्य सुरू करू शकता. त्यामुळे नुकसान होणार नाही, असे प्रतिपादन अलिबाग-मुरुडचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी केले.

मुरुड तहसिलदार कार्यालयाने कै.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी तहसिलदार रोहन शिंदे, नायब तहसिलदार गोविंद कोटंबे, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, श्री.सानप, पंचायत समिती गटविकास अधिकारी सुभाष वाणी हे उपस्थित होते.

यावेळी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांना मागदर्शन करताना आपत्ती सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील म्हणाले की, वादळ, पूर, अतिवृष्टी यावेळी जनतेची सेवा करताना कुणीतरी घरी आपली वाट पाहत आहे, हा विचार प्रत्येक कर्मचाऱ्याने करायला हवा. आपला मोबाईल कायम सुरू ठेवून त्याचे लोकेशन चालू ठेवावे.

यावेळी आपत्ती व सुरक्षा मित्र नेहा पाखे, उदय सबनीस व विकास रणपिसे यांनी साप, विंचू दंश झाल्यास द्यावयाचे प्रथमोपचार, सीपीआरबाबाबत ची माहिती दिली तसेच एखाद्या ज्येष्ठ नागरिकास वा रुग्णास डोंगरावरून चादरीत रुग्णवाहिकेपर्यंत कसे न्यावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

महिला सुरक्षेसाठी 112 क्रमांकाला कॉल करताच मुरुड पोलीस ठाण्याच्या महिला शिपाई श्रीमती वारीक, सहायक फौजदार वाणी हजर झाले. तसेच अपघात प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला फोन करताच ही रुग्णवाहिका 20 मिनिटात हजर होते, याचेही प्रात्यक्षिक डॉ.अमित मोरे व वाहक दीपेश गुरव यांनी उपस्थितांना दाखविले.

या शिबिरास तालूक्यातून 70 सरपंच-उपसरपंच उपस्थित होते. शेवटी नायब तहसिलदार गोविंद कोटंबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज