जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर सेवानिवृत्त

 


अलिबाग, दि.01 (जिमाका):- शासकीय नियमानुसार दि.31 मे 2022 रोजी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर व शिपाई श्री.कृष्णा नाईक हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्य करणारे, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात कार्य करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी हॉटेल गुरूप्रसाद येथे उपस्थित होते.

आरोग्य विभागात उरण येथे कार्यरत असलेले कर्मचारी श्री.हरीश पाटील यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत गोळा करून राष्ट्रीय क्षयरोग कर्मचारी संघटनेच्या वतीने श्री.हरीश पाटील यांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी मावळते जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार केला. तसेच श्री.कृष्णा नाईक यांचा सपत्नीक सत्कार डॉ.सुरेश देवकर यांनी केला. एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून डॉ.सुरेश देवकर यांनी रायगड जिल्ह्यात चांगले काम केले, असे गौरोवोद्गार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी यावेळी काढले व भावी आयुष्यासाठी त्यांना चांगले आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ठोकळ, तालुका आरोग्य अधिकारी अलिबाग डॉ.अभिजित घासे व जिल्हा लेखा अधिकारी श्री.संतोष पाटील यांनी डॉ.देवकर व श्री.कृष्णा नाईक यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी आरोग्य पर्यवेक्षक श्री.उदय चव्हाण, जिल्हा पी.पी एम.समन्वयक श्री.सतिश दंतराव, सर्वश्री मनोज बामणे, सचिन देशपांडे, दिपक धुमाळ, रितीश पाटील, किर्तीकांत पाटील, महेश भोसले, संतोष पाटील, निलेश दुदुसकर, राजू पालवणकर या सर्वांनी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवकर व श्री.कृष्णा नाईक यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गौरवोद्गार काढून त्यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

यावेळी तसेच सौ.करिष्मा प्रशांत नाईक यांनी आपल्या वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ.देवकर यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

श्री.जितेंद्र अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले, तर श्री.रवींद्र माने यांनी आभार मानले. यावेळी आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज