अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
अलिबाग, दि.13 (जिमाका):- अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी, शिकावू परिचारिका यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षाविषयक शिबीर काल (दि.12 जुलै 2022) रोजी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक जयपाल पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षाविषयक व्याख्याते श्री.जयपाल पाटील यांचे स्वागत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी उपस्थितांना प्रत्येकाने आपत्ती कशा प्रकारे येते, यापासून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याबाबतचे प्रशिक्षण व्याख्याते जयपाल पाटील यांच्याकडून घेवून आपत्तीकाळात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी डॉ.गवई म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आपण सर्वजण आपत्तीग्रस्तांची सेवा करतो, मात्र आपत्तीकाळात स्वत:ची व कुटुंबियांची सुरक्षा कशा प्रकारे करावी, याची माहिती जयपाल पाटील देतात. ते देत असलेली माहिती अतिशय महत्त्वाची असून त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण घ्यावा अन् ही माहिती इतरांनाही द्यावी.
यावेळी जयपाल पाटील यांनी घरातील गॅस, विजेची साधने सुरक्षितरित्या कशी हाताळावीत, मोबाईलचे धोके आणि सुरक्षा, विशेषत: महिला वर्गासाठी कोणताही आपत्तीजनक प्रसंग उद्भवल्यास महाराष्ट्र पोलिसांच्या 112 तर अपघात झाल्यास 108 रुग्णवाहिका व प्रसूतीसाठी 102 रुग्णवाहिका या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर आदी विषयांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रात्यक्षिक म्हणून 112 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करण्यात आला असता अलिबाग पोलीस ठाण्यातून महिला पोलीस हवालदार शारदा भगत, पोलीस हवालदार सुनिल फड, प्रकाश हंबीर हे प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी तात्काळ दाखल झाले. या कार्यशाळेचा लाभ जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यास मेट्रन श्रीमती साळवी, थळे, मोकल, पाटील, बावरे, जोशी, राऊत, कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेट्रन नेहा चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन मेट्रन सिमा पाटील यांनी केले.
00000
Comments
Post a Comment