जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांना दिली जाणार पर्यावरण संवर्धन शपथ


अलिबाग, दि.27 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.14 ऑगस्ट 2022 रोजी रायगड जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी वृक्ष लागवड करण्यासोबतच विद्यार्थी व नागरिकांना पर्यावरण संवर्धन शपथ दिली जाणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याला दि.15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा भाग म्हणून दि.14 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाभरात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी बांबू तसेच विविध प्रजातींची झाडे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट यांचा सहभाग घेण्यात येणार असून, त्यांना पर्यावरण संवर्धन शपथ देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

 

पर्यावरण संवर्धन- शपथ

- मी अशी शपथ घेतो की, निसर्गाशी संबंधित पृथ्वी वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांशी निगडीत जीवन प्रणाली अंगीकारून माझी वसुंधरा स्वच्छ वसुंधरा या संकल्पाला पूर्ण करीन.

- मी हरित आच्छादनासाठी वृक्ष लागवड वृक्षांचे संवर्धन व निगराणी करण्यास कटीबद्ध राहीन.

- मी गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी, शोषखड्डे व परसबागाची निर्मिती करेन.

- मी घरातील ओला व सुका कचऱ्याचे घरगुती पातळीवर वर्गीकरण करेन.

- मी उघड्यावर कचरा टाकणार नाही, तसेच मी प्लास्टिकचा वापर न करता कापडी अथवा कागदी वस्तूंचा वापर करेन.

- मी पावसाचा प्रत्येक थेंब अडवेन व जलसंवर्धनासाठी रेन-वॉटर हार्वेस्टींग, वनराई बंधारे बांधणे व नदी, नाले, तळ्यांच्या स्वच्छतेसाठी उत्स्फूर्तपणे श्रमदान करेन. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करेन.

- मी पर्यावरणाचे रक्षण व स्वच्छ सुंदर गावांच्या निर्मितीसाठी सदैव प्रयत्नशील राहीन.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज