मतदारयाद्यातील तपशिलाशी जोडणी आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांक जोडणी कार्यक्रम सुरु
अलिबाग,दि.14(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाकडील दि.23 जून 2022 च्या पत्रान्वये केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाद्वारे निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्य लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुषंगाने मतदारयादी संदर्भातील नमुना अर्ज 6, 7, 8 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामधील कलम 23 नुसार मतदारयादीतील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. याकरिता मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 260 मधील नियम 26बी नुसार फॉर्म नंबर 6ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दि.01 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणार आहेत, तरी मतदारांनी मतदारयादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांना मतदारयादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि विहित रितीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच अधिसूचना दि.17 जून 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि.01 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदारयादीत असलेली प्रत्येक व्यक्ती त्याचा आधार क्रमांक उपलब्ध करुन देऊ शकतो.
विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांशी ओळख प्रस्थापित करणे आणि मतदारयादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच नावाची नोंदणी ओळखणे, हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे, हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच अर्ज क्र. 6ब च्या छापील प्रतीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल/ अॅपच्या माध्यमातून स्व-प्रमाणीकरण व स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरता येतील.
स्व-प्रमाणीकरण- भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल/अॅपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6ब भरून आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कडे नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे आधारचे प्रमाणीकरण करु शकतो. तथापि तपशिलात फरक असल्यास प्रमाणीकरण अपयशी ठरण्याची शक्यता आहे.
स्व-प्रमाणीकरणाशिवाय- जर मतदारास स्व-प्रमाणीकरण करावयाचे नसल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रमाणीकरण अपयशी ठरत असल्यास, मतदार त्याच्या स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सादर करू शकतो.
घरोघरी भेट देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरातही मतदारांना छापील नमुना अर्ज क्र. 6ब पुरविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे प्राधिकृत केलेली मतदार सुविधा केंद्रे, ई-सेवा केंद्रे आणि नागरिक सेवा केंद्रांद्वारे वरील तपशील देखील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून गोळा करण्यात येणार आहे.
आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदारयादीतील त्याच्या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. जर, मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामुळे त्याचा/तिचा आधार क्रमांक सादर करता येत नसेल, तर मतदाराला नमुना अर्ज क्र. 6ब मध्ये नमूद केलेल्या अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी उदा, पॅनकार्ड, फोटोसह पासबुक, पासपोर्ट, मतदार कार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसह पेन्शन कागदपत्र, केंद्र व राज्य शासन कर्मचान्यांचे ओळखपत्र इ. कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.
मतदारयादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराच्या आधार क्रमांक सादर करण्यास/आधार क्रमांक देण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदारयादीतील कोणतीही नोंद वगळता येणार नाही. विविध माध्यमांद्वारे ERONET मध्ये डिजिटल केलेला 12 अंकी आधार क्रमांक कोणत्याही परिस्थितीत ERONET मध्ये संग्रहित केला जाणार नाही. मतदारांनी आधार जमा करणे, हे ऐच्छिक आहे आणि केवळ आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेमुळे त्यांची नावे मतदारयादीतून काढून टाकली जाणार नाहीत.
तरी दि.01 ऑगस्ट 2022 पासून सर्व मतदारांनी आपल्या मतदारयादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment