नागरिकांची सुरक्षितता अन् उत्तम आरोग्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न
अलिबाग,दि.14(जिमाका):- जिल्हा
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी निवारा शेड मध्ये स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, येणाऱ्या कालावधीमध्ये मनुष्यबळ, मशिनरी उपलब्ध करणे, पावसाळ्याचे पाणी साठून उद्भवणाऱ्या साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस इत्यादी साथरोग नियंत्रणासाठी औषधसाठा उपलब्ध करणे, वैद्यकीय पथके नेमणे, अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी तपासणी करणे,जेणेकरुन पावसाळ्यामध्ये अन्नपदार्थांची भेसळ होवून अनावश्यक साथरोग व विषबाधा होणार नाही, अशा विविध विषयांबाबत सविस्तर आढावा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी घेतला.
यावेळी त्या म्हणाल्या की, जून ते सप्टेंबर या कालावधीत पाण्याची जैविक तपासणी करणे गरजेचे असून पाण्याची जैविक तपासणी साथरोगाला आळा बसण्याच्या (जसे काविळ, अतिसार, कॉलरा इ.) दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. तरी नागरिकांनी व संबंधित अधिकाऱ्यांनीही प्रयोगशाळेतून पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी.
तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावरील सर्व वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.बैनाडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची सुरक्षितता व उत्तम आरोग्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज आहे. जे अधिकारी-कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र काम करीत आहेत, त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासन सदैव आहे, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.बैनाडे यांनी या बैठकीत सर्व उपस्थितांना दिला.
रायगड जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कार्यालयाच्या अंतर्गत 06 पाणी तपासणी प्रयोगशाळा (01 जिल्हा व 05 उपविभागीय प्रयोगशाळा) कार्यरत आहेत. जिल्हा प्रयोगशाळा अलिबाग तालुक्यात व पेण, महाड, माणगाव, कर्जत, रोहा तालुक्यात अशा एकूण 05 उपविभागीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत. तसेच आरोग्य विभागांतर्गत 01 जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा अलिबाग तालुक्यात कार्यरत आहेत. या प्रयोगशाळांमार्फत सार्वजनिक तसेच खाजगी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करुन पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. या प्रयोगशाळांचे सनियंत्रण उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्यामार्फत केले जाते.
अतिवृष्टीमुळे तसेच पूरसदृश्य परिस्थितीमुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याची दाट संभावना असते. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेतून पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले असल्याचेही श्रीम. डॉ.बैनाडे यांनी सांगितले.
00000
Comments
Post a Comment