चेंढरे ग्रामपंचायत सभागृहात संवेदीकरण कार्यशाळा संपन्न

 


अलिबाग, दि.02 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय आयोजित एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना एचआयव्ही एड्सच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी संवेदीकरण कार्यशाळा ग्रुप ग्रामपंचायत चेंढरे येथील स्वर्गीय प्रभाकर नारायण पाटील सभागृह येथे नुकताच संपन्न झाला.

यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड अलिबागचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, आयसीडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, रुपेश पाटील, पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील, दीप्ती मोकल, उल्का कुलकर्णी, कल्पिता साळावकर, विनोदिनी मोकल, गीताई कटोर तसेच अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविका प्रशिक्षणासाठी उपस्थित होत्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी एड्स विषयी माहिती दिली. एड्सची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय, सामाजिक स्थान व आपले कर्तव्य काय आहे, एड्स वर नियंत्रण कसे करता येईल, याविषयी सखोल माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आली. समाजात आजही एड्स विषयी जनजागृतीची आवश्यकता का आहे तसेच त्यात आपली भूमिका काय असली पाहिजे हे अंगणवाडी सेविकांना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाचा मूळ उद्देश एड्स विषयी जनजागृती करणे हा असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे संजय माने यांनी यावेळी सांगितले. तर आजपर्यंत अनेक अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित केले असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी आयसीडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांनी महाराष्ट्र शासनामार्फत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा अभियान, आरोग्य व स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी डॉ.सुभाष माने तसेच ग्रुप ग्रामपंचायत चेंढरेचे सरपंच व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका जिविता पाटील यांनी केले तर अंगणवाडी सेविकांतर्फे वैशाली पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिक्रिया दिली. शेवटी पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत