पर्यावरणपूरक, निर्मल गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हावे -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील


 

अलिबाग,दि.30(जिमाका):- गणेशोत्सव पर्यावरण पूरक व पर्यावरण स्नेही व्हावा, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेतर्फे यावर्षी ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव कालावधीत दि.31 ऑगस्ट  ते दि.09 सप्टेंबर 2022 या कालावधीत स्पर्धा होतील.

             रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मंडळे, व्यक्ती, संस्था, घरगुती पातळीवरील गणपती तसेच ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

             यासाठी bit.ly/raigadganpati या गुगल लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. गुगल लिंकवर गणेशोत्सव कालावधीत राबविलेल्या उपक्रमाचे फोटो व व्हिडीओ अपलोड करावयाचे आहेत, फोटो व व्हिडीओ स्पष्ट असावेत, सहभागी मंडळानी निर्माल्य व्यवस्थापन, पाणी व स्वच्छता विषयी जनजागृती साठी स्लोगन, प्लास्टिक बंदीची जिंगल्सद्वारे तसेच पोष्टर व बॅनरद्वारे जनजागृती करणे. श्रमदानातून परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, प्लास्टिक संकलन, गणेश मूर्तीचे विसर्जन हे कृत्रिम तलावात करणेसाठी प्रोत्साहन देणे आदी उपक्रम अपेक्षित आहेत.

             या स्पर्धेचे तांत्रिक सहाय्य व परीक्षण करण्याकरिता जिल्हास्तरावरून परीक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. स्पर्धेचे निकष पूर्ण करणाऱ्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना/ ग्रामपंचायतींना बक्षीस रक्कम अनुक्रमे 5 हजार रुपये,  3 हजार रुपये व 2 हजार रुपये व उतेजनार्थ दोन मंडळाना प्रत्येकी 1 हजार रुपये अशी बक्षिसे व प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह समारंभपूर्वक देवून गौरविण्यात येईल.  तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मंडळांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.     

             अधिक माहितीसाठी पंचायत समिती मधील गट समन्वयक व समूह समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा.

जास्तीत जास्त मंडळे, संस्थांनी या स्पर्धेत सहभागी होऊन पर्यावरण पूरक व निर्मल गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी श्रीमती शुभांगी नाखले यांनी केले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज