गौण खनिज उत्खनन परवानगीची कार्यवाही दि.1 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन “महाखनिज” ही संगणक प्रणाली लागू
अलिबाग,दि.20 (जिमाका):- शासनाने गौण खनिज उत्खनन परवानगीची कार्यवाही दि.1 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने राज्यात गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुकीचे संनियंत्रण व देखरेख करण्यासाठी “महाखनिज” ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये खाणपट्टा मंजूरीबाबत खाणपट्ट्याच्या नूतनीकरण तसेच अल्पमुदतीचे तात्पुरत्या गौण खनिज उत्खनन परवान्याबाबतचे अर्ज ऑनलाईन स्विकारण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
राज्यात महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 लागू करण्यात आला. या नियमामधील तरतुदीनुसार गौण खनिजाचा खाणपट्टा/नूतनीकरणाच्या मंजूरीबाबत तसेच अल्प मुदतीचे तथा तात्पुरत्या स्वरुपाचे गौण खनिज उत्खनन परवाने देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सद्यःस्थितीत संबंधित अर्जदारांकडून क्षेत्रीय कार्यालयामध्ये खाणपट्टा/नूतनीकरणाच्या मंजूरीसाठी तसेच अल्प मुदतीचे तथा तात्पुरत्या स्वरुपाचे परवान्यासाठी अर्ज ऑफलाईन स्वरुपात स्विकारण्यात येतात.
तरी खाणपट्टा मंजूरीबाबत, खाणपट्ट्याचे नूतनीकरण तसेच अल्पमुदतीचे / तात्पुरत्या गौण खनिज उत्खनन परवान्याबाबतचे अर्ज दि.1 ऑक्टोबर 2022 पासून “महाखनिज” या संगणक प्रणालीवर ऑनलाईन स्विकारण्यात येतील तसेच वरील तारखेनंतर ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असे अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment