शारीरिक विकास व रोगांवर मात करणारे बालक हे सुदृढ बालक पोषण अभियानांतर्गत बोर्ली येथे बालक स्पर्धेचे आयोजन

 


 

  अलिबाग,दि.21(जिमाका):-  संपूर्ण शारीरिक विकास व रोगांवर मात करणारे बालक हे सुदृढ बालक म्हणून ओळखले जाते. बाळाच्या संपूर्ण शारीरिक विकासासाठी पालकांनी शून्य वयोगटापासून विविध लसीकरण करून घेऊन त्यांना सकस आहार द्यावा, जेणेकरून त्यांची रोगावर मात करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढेल,असे प्रतिपादन बोर्लीचे सरपंच चेतन जावसेन यांनी केले.  पोषण अभियानांतर्गत आयोजित बोर्ली ग्रामपंचायत सभागृहात बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य भारती बंदरी,ग्राम विकास अधिकारी पांडुरंग गाडेकर,आरोग्य सेविका संध्या भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

    उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच डॉ. चेतन जावसेन यांनी सांगितले की,राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पोषण अभियान अंतर्गत पोषण महिना राबविला जात आहे. पोषण अभियान अधिकाधिक व्यापक होवून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यायला हवे. याकरिता घराघरात जनजागृती होणे आवश्यक आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘सुदृढ बालक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.  लहान मुलांना नेहमी काही तरी खाण्यासाठी काही नवीन हवे असते. बाजारात जसे लहान मुलांना भुरळ घालणाऱ्या जाहिराती, प्रलोभने, आकर्षक पॅकिंग आणि चटपटीत पदार्थ यांचा वापर करून मुलांना जंक फूड घेण्यास प्रवृत्त करतात, हे टाळावे, त्याऐवजी सत्त्व टिकून राहतील आणि मुलांना चवीला चांगले लागतील, असे पदार्थ घरातच बनवावेत. लहान मुलांसमोर सतत चांगल्या गोष्टी करत राहिलो तर त्यांना देखील चांगल्या गोष्टी करण्याची सवय लागते. मुलांच्या आहाराबाबत पालकांनी दक्ष राहिले पाहिजे, विशेष माता पालकांनी आपल्या मुलांना काय आवडते तसेच त्याला काय खायला द्यायला हवे याचा विचार करायला हवा त्यानुसार आहार तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.

   आरोग्य सेविका संध्या भोईर यांनी सांगितले की, लहान वयातच आरोग्याविषयी नेहमीच महत्त्व पटवून द्यावे. आमचे मूल वजनाने अधिक आहे म्हणून त्यास सुदृढ समजू नये. बालकांची दर दोन तीन महिन्यानंतर संपूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी. तसेच वयोगटानुसार ठरविल्याप्रमाणे सर्व प्रकारचे लसीकरण करून घ्यावे.

यावेळी झालेल्या सुदृढ बालक स्पर्धेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका ,ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज