लम्पी आजाराबाबत आढावा व त्यावरील उपाययोजनांबाबत अलिबाग तहसील येथे समितीची बैठक संपन्न
अलिबाग,दि.20 (जिमाका):- अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची लम्पी आजाराबाबतचा आढावा व त्यावरील उपाययोजनांबाबत सोमवार, दि.19 सप्टेंबर रोजी अलिबाग तहसिलदार कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीत अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभांगी नाखले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, अलिबाग डॉ.राजेश लाळगे, पंचायत समिती अलिबाग पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.प्रिया काळे, नायब तहसिलदार व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार मीनल दळवी यांनी या समितीच्या स्थापनेबाबत शासनाच्या भूमिकेबाबत माहिती दिली. पंचायत समिती अलिबाग पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.प्रिया काळे यांनी लम्पी आजाराची लक्षणे व त्यानुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.राजेश लाळगे यांनी लम्पी आजाराचा माणसांमध्ये प्रसार होत नाही तसेच दुग्धजन्य पदार्थ सेवन केल्यासही लम्पी आजार होऊ शकत नाही, अशी माहिती दिली. अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभांगी नाखले यांनी लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधावा, असे आवाहन केले.
लम्पी आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी सर्व विभाग एकत्रित येऊन काम करतील, अशी भावना व्यक्त करून समितीच्या बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांचे तहसिलदार मीनल दळवी यांनी आभार मानले.
00000
Comments
Post a Comment