स्मार्ट प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे शेतकरी उत्पादक कंपन्यांना आवाहन


 

अलिबाग,दि.10 (जिमाका):- जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची व शेतकरी गटाची सभा नुकतीच अलिबाग येथे पार पडली. यावेळी जिल्हा अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) प्रमुख तथा प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा कृषी अधीक्षक उज्जवला बाणखेले, स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी श्री.रामेश्वर पाचे, जिल्हा नोडल अधिकारी तथा प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री.सतिश बोऱ्हाडे आणि पुरवठा व मूल्य साखळी विकास तज्ञ श्री.भाऊसाहेब गावडे तसेच तालुक्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष/प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्रीमती उज्जवला बाणखेले यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना स्मार्ट योजनेचे महत्व पटवून सांगितले. राज्य शासन जागतिक बँकेच्या माध्यमातून 60 टक्के अनुदान देत असून आपण स्मार्ट प्रकल्पामध्ये सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.रामेश्वर पाचे यांनी शेतकरी कंपन्यांना प्रस्ताव तयार करण्यामध्ये असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामध्ये सभासद संख्या व वार्षिक उलाढाल या अटी शिथिल करण्यात याव्यात, अशी मागणी कंपनी प्रतिनिधींनी मांडली. याविषयी बोलताना जिल्हास्तरावरुन अटी व शर्ती शिथिल करण्याविषयी प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल, असे श्रीमती बाणखेले यांनी सांगितले.

प्रकल्प नोडल अधिकारी श्री.सतिश बोऱ्हाडे यांनी जिल्ह्यासाठी केवळ 15 शेतकरी उत्पादक कंपन्यांचा लक्षांक असल्यामुळे लवकरात लवकर प्रस्ताव प्राथमिक मंजूरीसाठी सादर करावेत व आवश्यक असणारी कागदपत्रे, शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, लेखापरिक्षण अहवाल, सभासदांची यादी व खरेदीदारासोबतचा करार इत्यादी कागदपत्रे सादर करण्याविषयी आवाहन केले.

मूल्य साखळी विकास तज्ञ श्री.भाऊसाहेब गावडे यांनी प्रस्ताव सादर करीत असताना दुग्धव्यवसाय आधारित, कुक्कुटपालन आधारित, शेळीपालन आधारित किंवा मत्स्यव्यवसाय आधारित प्रकल्प वगळता इतर जास्तीत दोन किंवा तीन धान्य पिके किंवा फळवर्गीय पिकाची मूल्यसाखळी विकसित करण्याच्या दृष्टीने प्रक्रियेसंदर्भातील किंवा ग्रेडींग पॅकिंग व विक्री किंवा ग्रेडींग पॅकिंग निर्यात संबंधी प्रस्ताव कंपन्यांनी सादर करावेत, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री.सतिश बोन्हाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्मार्ट प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी 9359399383/9967838104 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक