जिल्हा टी.बी.फोरम समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न


अलिबाग, दि.19 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या जिल्हा टी.बी.फोरम समन्वय समितीची व जिल्हा कोमॉर्बिडीटी समन्वय समितीची सभा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली.

यावेळी जिल्ह्यातील क्षयरुग्णांची स्थिती, त्यांच्याकरिता असणाऱ्या योजनांची माहिती, त्यांना आर्थिक लाभ घेताना (DBT) त्यात येणाऱ्या अडचणी, नि:क्षय मित्र याविषयी माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री टी.बी. मुक्त अभियान या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात दि.9 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आली. या योजनेद्वारे क्षयरुग्णांना उपचार सुरू असेपर्यंत त्यांना दत्तक घेऊन पोषक आहार व सकस आहार वाटप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही योजना सुरू झाल्यापासून जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी नि:क्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना सहाय्य करावे, असे आवाहन करणारे परिपत्रक जारी केले होते. या आवाहनास जिल्ह्यातील विविध क्षेत्रांनी उत्तम प्रतिसाद दिला. जिल्ह्यात आतापर्यंत दहा नि:क्षय मित्र झाले असून, 283 क्षयरुग्णांना पोषक आहार व सकस आहार देण्यात येत आहे. क्षयरुग्णांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाड येथील सरपंच श्री.सोमनाथ ओझर्डे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच सत्कारही करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध कंपन्या, संस्था, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील क्षयरुग्णांना दत्तक घेऊन, त्यांना उपचार सुरू असेपर्यंत पोषक आहार व इतर सहाय्य उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ठोकळ, प्रा.डॉ.अश्लेषा तावडे, डॉ.प्रताप शिंदे, डॉ.अशोक कटारे, अलिबाग इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.विनायक पाटील, डॉ.शितल जोशी, डॉ.पावनकर, श्री.संजय माने, श्री.सतीश दंतराव, लोकपरिषद, पनवेल संस्‍थेचे श्री.अशोक गायकवाड, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट पेणचे श्री.मनोज गावंड, आधार ट्रस्ट, रोहाचे श्री.विजय नायर, विहान ट्रस्ट पनवेलचे श्री.सुनील पटेल, हुमाना संस्थेचे प्रतिनिधी श्री.जहांगीर आलम, कॉर्पोरेट प्रतिनिधी श्री.संतोष पाटील, जे.एस.डब्ल्यू कंपनीचे प्रतिनिधी श्री.सुधीर तेलंग हे मान्यवर तसेच श्री.किर्तीकांत पाटील, श्री.दत्तात्रेय शिंदे, श्री.राम गोल्हार, श्री.राजू पालवनकर हे कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक