पनवेल तालुक्यात “सुवर्णा” भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण


अलिबाग, दि.17 (जिमाका):- महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी सन 1944 सालापासून खरीप व रब्बी हंगामात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत असून, याबाबत महाराष्ट्र शासनाने पीक कापणी प्रयोग व्यवस्थित रितीने होण्यासाठी वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांच्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात वाटप करुन व समन्वय साधून पिक कापणी प्रयोगाची आखणी व अंमलबजावणी गेली अनेक वर्षे सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील दि.13 ऑक्टोबर 2022 रोजीच्या सुधारीत यादीनुसार गावनिहाय एकूण 18 (एका गावासाठी प्रत्येकी 2 असे एकूण 36) पीक कापणी प्रयोग निश्चित केले आहेत. त्यानुसार आंबे तर्फे वाजे येथे शेतकरी बाळाराम पालांडे आणि वसंत पाटील यांच्या शेतात सुवर्णा या भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार राहूल सुर्यवंशी, मंडळ अधिकारी अजित पवार, तलाठी श्रीनिवास मेतरी, कोतवाल पद्माकर चौधरी व सिताराम वारगडा हे उपस्थित होते.

शासनाकडील निर्देशानुसार दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी सर्व पीक कापणी प्रयोग महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांना नेमून दिलेल्या उद्दिष्टांनुसार व संबंधित पर्यवेक्षण अधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली यशस्वीरित्या पूर्ण करुन त्याची माहिती शासनाच्या CCE Agri या ॲपवर अपलोड करण्यात आली आहे.

पिक कापणी प्रयोगातील प्राप्त आकडेवारी वरुन प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिक कापणी प्रयोग हे पिकनिहाय नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. तसेच शासनास देखील पिक उत्पन्नाचा अंदाज, शेतमालाची खरेदी, शेतमाल निर्यात धोरण अशा विविध बाबीकरींता पिक कापणी प्रयोगातील आकडेवारीची आवश्यकता भासते.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज