फ्रीडम रायडर बाईकर रॅलीचे खोपोलीत जंगी स्वागत
अलिबाग, दि.17 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 75 बाईकर्स पुर्ण भारतभर, भारताचा सांस्कृतिक वारसा, शारिरीक स्वास्थ्य आणि बंधुभाव वृध्दींगत करण्यासाठी भ्रमंती करणार आहेत. याच आयोजनातून पुण्याहून मुंबईकडे प्रस्थान करत असताना रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खोपोली शहरात रॅलीच्या स्वागताचा आणि कौतुकाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
याप्रसंगी शुभेच्छा आणि स्वागत करण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र हातनूर, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे, जेष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार, “अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी” सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर, अमोल कदम, हनिफ करजीकर, दिलीप देशमुख, विजय चव्हाण, भरत शिंदे, दिवेश पालांडे आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी कर्मचारी, खेलो इंडिया अभियानातील खेळाडू तसेच स्व.भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकूल यांच्या वतीने शेकडो विद्यार्थी आणि खेलो इंडिया कुस्ती केंद्राचे कुस्तीगीर, खेळाडू उपस्थित होते.
फ्रीडम रायडर बाईकर रॅलीचे संस्थापक अध्यक्ष तथा समन्वयक हर्षल मोदी यांनी यावेळी आपल्या मनोगतात माहिती देताना हा 75 दिवसांचा हा प्रवास असून 15 ते 34 राज्यातून 21 हजार किलोमीटर प्रवास हे 75 बाईकर्स करणार आहेत असे सांगितले. आपण या स्वागताने भारावून गेल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावरून प्रवास करत असताना खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयाच्या प्रांगणात या रॅलीतील बाईकर्सचे पुष्पवृष्टीने भव्य स्वागत करण्यात आले होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बाईकर्सनी विद्यार्थ्यांसमवेत आपले अनुभव कथन करून छायाचित्रेही काढली. सर्व वयोगटातील बाईकर्समध्ये महिलांचाही समावेश होता. अत्यंत शिस्तबद्धरीत्या मुंबईकडे प्रस्थान करीत असताना सर्वांनी देशभक्तीपर घोषणा देत रॅलीला शुभेच्छा दिल्या.
00000
Comments
Post a Comment