खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा बैठक संपन्न


लोकाभिमुख योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दिल्या सूचना



अलिबाग, दि.18 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांविषयी संबंधित विभागांच्या विभाग स्तर / जिल्हास्तरावरील अधिकारी तर काही राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांविषयीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लोकाभिमुख, लोकोपयोगी विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, राजेंद्र भालेराव, शुभांगी नाखले, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी अमिता पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, अलिबाग पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापक, कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, आरसीएफ, गेल, महावितरण, भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), जिओ लिमिटेडचे तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



या बैठकीत खासदार सुनिल तटकरे यांनी पंतप्रधान स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना (फळ पिक विमा योजनेंतर्गत आंबा-काजू सारख्या फळ पिकांच्या विमा हप्त्यात तफावत), जल जीवन मिशन योजना व आराखडा पायाभूत सुविधा कार्यक्रम (महामार्ग) व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग यांचे प्रलंबित भूसंपादन व इतर विषय, पायाभूत सुविधा कार्यक्रम रेल्वे व कोकण रेल्वे भूसंपादित प्रलंबित व प्रकल्पग्रस्तांचे विषय, अलिबाग येथे पासपोर्ट कार्यालय उभारणे, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), पायाभूत सुविधा कार्यक्रम (दूरसंचार) व डिजिटल इंडिया पब्लिक इंटरनेट एक्सेस प्रोग्राम, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना विस्तारीकरण व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, आरसीएफ विस्तारीकरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व नुकत्याच झालेल्या स्फोटाबाबत, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, कृषी वीज पंप जोडणे व जिल्हा नियोजनाच्या प्रलंबित महावितरणच्या कामाबाबत, संसद आदर्श ग्राम योजना व संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) या योजनांच्या अंमलबजावणीच्या सद्य:स्थितीबाबत आढावा घेतला.

या बैठकीच्या अनुषंगाने खासदार तटकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना द्यावा, महिलांना प्राधान्य द्यावे, अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून द्यावेत, केंद्र व राज्य शासनाच्या तसेच खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजनांना अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, कोणत्याही लाभार्थ्याला क्षुल्लक कारणांवरून योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवू नये, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे. बँकांच्या अधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून आलेल्या प्रस्तावांना कमीत कमी कालावधीत मंजूरी देवून गरजू लाभार्थ्याला सहकार्य करावे.

बैठकीच्या शेवटी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक