प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण योजना कार्यशाळा संपन्न
सहकारी संस्थांचे संगणकीकरण शासनाचा एक अभिनव उपक्रम
-जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे
अलिबाग, दि.17 (जिमाका):- आजवर देशात सहकारी बँकिंगमध्ये जे काही नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक सुरू करण्यासंदर्भात योजना आल्या त्यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सदैव रोल मॉडेल म्हणून काम केलेले आहे, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे संगणकीकरण हे भविष्यात आवश्यक असणार आहे हे अगोदरच ओळखून आमदार जयंत पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ही योजना सुरू केली आणि आज बँकेशी सलंग्न असणाऱ्या सहकारी संस्था या संगणकीकरणामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हेच काम आपल्याला येत्या काही दिवसात अधिक वेगाने आणि आधुनिकीकरण सत्यात उतरवून जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करणे अत्यावश्यक असणार आहे आणि त्याकरिता प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण हा शासनाचा अभिनव उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण योजना कार्यशाळेमध्ये केले.
तसेच सहकारी संस्था सक्षमीकरणासाठी जिल्हा उपनिबंधक या नात्याने आम्ही सर्वांशी जोडले गेलेले असून याकरिता नाबार्ड, जिल्हा सहकारी बँक यांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या कामांना अधिक बळकटी मिळत आहे असेही त्यांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त केले.
यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, बँकेचे मुख्य व्यवस्थापक भारत नांदगावकर, जिल्हा विशेष लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी संकेत घरत हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे यांनी देखील बँकेने आजवर आधुनिक सेवा सुरू करताना सदैव सकारात्मक भूमिका ठेवलेली असून याकरिता बँकेच्या संचालक मंडळाचे कौतुक केले, तसेच प्राथमिक कृषी सहकारी संस्था या अधिक व्यापक पद्धतीने व्यवसाय कसा उभारू शकतील याकरिता नाबार्डचे असणारे अर्थसाहाय्य आणि इतर सहाय्य त्वरित उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा सहकारी बँकेने आजवर नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी कटिबद्ध असून बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील आणि सर्व संचालक मंडळ सदैव उत्साही आणि सकारात्मक भूमिका घेतात त्यामुळे या योजनेत अगोदर बँकेने काम केलेले असले तरी यापुढे सुद्धा आवश्यक त्या सर्वच गोष्टी बँकेच्या वतीने वेळेत पूर्ण केल्या जातील याची ग्वाही दिली.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या वतीने भाऊसाहेब गावडे यांनी उपस्थितांना शासनाच्या स्मार्ट योजनेविषयी मार्गदर्शन केले. तर अग्रीकल्चर बिझनेस मार्केटिंग एक्स्पर्ट म्हणून जिल्ह्याचे प्रमुख तुषार जंगम यांनी विपणन क्षेत्रातील विविध योजनांवर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सहकारी निबंधक, लेखापरीक्षक, प्राथमिक कृषी सहकारी संस्थाचे सचिव आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समन्वयक म्हणून बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक संदीप जगे यांनी जबाबदारी पार पाडली.
00000
Comments
Post a Comment