मांडुळ जातीच्या सापाची विक्री करणाऱ्यांविरोधात वनविभागाची कारवाई
अलिबाग, दि.18 (जिमाका):- महाड तालुक्यातील मोहोत येथील सचिन सहदेव पवार यांच्याकडे सात महिन्यांपासून मांडुळ जातीचा साप ठेवला होता. त्या सापाची विक्री करणार असल्याची माहिती सिस्केप संस्था व आऊल्स संस्थेचे प्रतिनिधी यांनी महाड वनक्षेत्रपाल श्री.आर.बी.साहू यांना दिली. प्राप्त माहितीच्या आधारे महाड वनक्षेत्रपाल श्री.साहू यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भिवघर-निगडे रस्त्यालगत दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी सापळा लावून गस्त करीत असता सचिन सहदेव पवार (रा.मोहोत, ता.महाड, जि.रायगड) व महेश रमेश मालुसरे (रा.काळीज, ता.महाड, जि.रायगड) यांना मांडुळ जातीच्या सापाची विक्री करीत असताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत त्यांच्याकडील 2 मोबाईल, 1 मोटार सायकल व 1 जिवंत मांडुळ जातीचा साप ताब्यात घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर बिरवाडी वनपाल यांनी आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम चे कलम 9, 39, 44 (अ), (4), 48 (अ), 49, 51, 52 नुसार परिमंडळ बिरवाडी रौ.गु.नं, बन्यजीव 1/2022.23 दि.16.11.2022 अन्वये वनगुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी दिली आहे.
ही कारवाई रोहा उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत व रोहा सहाय्यक वनसंरक्षक श्री.व्हि.बी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
00000
Comments
Post a Comment