रोहा येथील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उपायुक्त प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न

 


 

अलिबाग,दि.08 (जिमाका) :-प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे रोहा तालुक्यातील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे  दि.07 डिसेंबर 2022 रोजी आदिवासी विकास ठाणे उपायुक्त श्री.प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न झाले.

यावेळी प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, माजी जिल्हा परिषद सदस्य,रोहा श्री.नंदकुमार म्हात्रे, सानेगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती स्वप्नाली भोईर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक, क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री.मोतीराम लेंडी, पेण वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष मोकल, वैद्यकीय पथक आदी मान्यवर उपस्थित होते.

पेण प्रकल्प कार्यालयांतर्गत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 14 शासकीय आश्रमशाळा व 10 अनुदानित आश्रम शाळा अशा एकूण 24  आश्रमशाळांतील  1 हजार 347   विद्यार्थ्यांनी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे.  दि. 7 डिसेंबर ते दि.9 डिसेंबर 2022 या कालावधीत शासकीय आश्रमशाळा सानेगाव ता. रोहा येथे 14,17 व 19 वयोगटांमध्ये वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व वीर बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करुन मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. तद्नंतर ईशस्तवन,स्वागतगीतासह शासकीय आश्रमशाळा सानेगाव येथील विद्यार्थीनींनी महुआ झरे आ या गोंडी आदिवासी भाषेतील गाण्यावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. त्यानंतर सहभागी क्रीडा पथकांनी ध्वज संचलन केले.

आदिवासी विकास ठाणे उपायुक्त श्री.प्रदीप पोळ आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले की, खेळामध्ये हार-जीत होतच असते. जे जिंकतील त्यांचे  अभिनंदनच पण जे जिंकणार नाहीत,  त्यांनी खचून जायचे नाही, आपल्यात न्यूनगंड निर्माण करून न घेता संघर्ष करीत पुन्हा जिंकण्यासाठी  अधिक जोमाने तयारी करावी.

 प्रकल्प अधिकारी श्रीम.शशिकला अहिरराव यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, क्रीडा स्पर्धा खेळाडू वृत्तीने घेतल्या पाहिजेत, खेळात हार झाली तरी हरकत नाही पण हिंमत हारून चालणार नाही. शून्यातून विश्व निर्माण करता आले पाहिजे, आम्ही शून्यातच होतो पण संघर्ष करून इथपर्यंतचा प्रवास शक्य झाला आहे. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा व पराभवाने खचून जावू नका. 

तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक  यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, काही नाविण्यपूर्ण योजना राबवून या खेळाडूंकरीता सुविधा उपलब्ध करून देण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच त्यांना खेळामध्ये मार्गदर्शन मिळण्याकरिता क्रीडा विभागातील तज्ञांचे मार्गदर्शन या खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येईल.

यावेळी सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली.  शेवटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.अरूण पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून उद्घाटनपर कार्यक्रम  संपल्याचे जाहीर केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत