माणगाव येथील दिवाणी न्यायाधीश,वरिष्ठ स्तर,माणगाव न्यायालयाचा दि.05 मार्च रोजी उद्घाटन कार्यक्रम
अलिबाग,दि.3,(जिमाका):-माणगाव येथे दि. 05 मार्च 2023 पासून दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे. भूसंपादन प्रकरणे, हिंदू विवाह कायद्यांतर्गत दाखल होणारी प्रकरणे, सरकार विरुध्दची प्रकरणे, रक्कम रुपये पाच लाखावरील दावे व इतर प्रकरणांसाठी श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या महसुली तालुक्यांकरिता पक्षकार व वकीलांना प्रकरणे दाखल करण्यासाठी अलिबाग येथे यावे लागत होते.त्यामुळे पक्षकारांना आर्थिक भूर्दंड पडत होता तसेच त्यांचा वेळही वाया जात होता. त्यामुळे या परिसरातील पक्षकार व वकीलांची माणगाव येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर हे न्यायालय सुरु करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होती.
श्रीवर्धन म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या महसुली तालुक्यांकरिता माणगाव, जिल्हा रायगड येथे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, माणगाव न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालयास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मा.उच्च न्यायालयाने मंजूरी दिली असून त्याबाबतची अधिसूचना विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.
या नूतन न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून श्रीमती ए.एन.नावंदर यांची मा.उच्च न्यायालयाकडून नियुक्तीही करण्यात आली आहे.त्यानुसार दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, माणगाव या न्यायालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. 05 मार्च 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता मा.न्यायमूर्ती श्री.अमित बोरकर, उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, जिल्हा रायगड यांच्या शुभहस्ते आणि मा.न्यायमूर्ती श्री. मिलिंद म.साठ्ये, उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, जिल्हा रायगड यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग श्रीमती शैलजा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, असे प्रबंधक, जिल्हा न्यायालय,रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
0000000
Comments
Post a Comment