जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी मानिव अभिहस्तांतरण मोहीम अलिबाग तालुक्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांनी संपर्क साधावा

 

 

अलिबाग,दि.17(जिमाका):- अलिबाग तालुक्यातील सर्व नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांनी आपल्या संस्थेची इमारत सहकारी संस्था म्हणून ज्या जमिनीवर नोंदणीकृत आहे, ती जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी मानिव अभिहस्तांतरण मोहीम शासनाच्या सहकार विभागा मार्फत सुरू केली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील 31 मार्च 2023 अखेर 498 नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. यापैकी अगदी कमी प्रमाणात गृहनिर्माण सहकारी संस्थांचे अभिहस्तांतरण झाले आहे.

 सहकार आयुक्त व निबंधक सहकार संस्था, पुणे यांच्या दि.24 मार्च 2023 रोजीच्या कार्यालयीन परिपत्रकानुसार निर्गमित परिपत्रकीय सूचना तथा शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालील जमिनीची मालकी ही त्या संस्थेच्या नावे हस्तांतरित होणे यालाच अभिहस्तांतरण असे म्हणतात.  तथापि विकासक यांच्या असहकारामुळे किंवा संस्थेतील पदाधिकारी व सदनिकाधारक यांच्या अज्ञानामुळे किंवा याबाबत त्यांना ज्ञान न मिळाल्यामुळे आपल्या संस्थेची इमारत ज्या भूमीवर उभी आहे, त्या भूमीचे क्षेत्र आपल्या (संस्थेच्या) मालकीचे व्हावे यासाठी, नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांचे मानिव हस्तांतरण मोहिमेला प्राधान्याने चालना देण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.

 अलिबाग तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया, कार्यालयाची सुनिश्चित वेळ, अपुरे मनुष्यबळ व मनुष्य तास यांचा पुरेपूर वापर करून कमी कालावधीत जास्तीत जास्त संस्थांना संदेश पोहोचविण्याची रूपरेषा आहे. हे चर्चा सत्र ज्या ठिकाणी आयोजित होईल, तेथे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. तसेच नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांनी अभिहस्तांतरण झालेले असल्यास त्यांची नोंदणीकृत या कार्यालयास दाखल करावी व ज्या संस्थांचे मानिव अभिहस्तांतरण झालेले नाही त्यांनी आपल्या संस्थेची माहिती लेखी पत्राद्वारे व संपर्क क्रमांकासह या कार्यालयास अवगत करावे.  तसेच सदर पत्र व्यवहार या कार्यालयाच्या arcs_alibag@rediffmail.com, या ईमेलवर करून प्रत्यक्ष संपर्क साधावा, जेणेकरून शासनाचे ध्येय धोरण राबविण्यास गृहनिर्माण सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा पत्ता सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अलिबाग यांचे कार्यालय ब्राह्मण उत्कर्ष मंडळ इमारत, पहिला मजला, ब्राह्मणआळी, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे तालुका अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अलिबाग श्री.अशोक धो.मोरे यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज