केंद्र शासनाच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा “आपल्या गावातच”


 

            अलिबाग,दि.12 (जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटूंबास रु.2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे रु.6 हजार प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून 2023 मध्ये जमा होणार आहे.  केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

             सद्य:स्थितीनुसार रायगड जिल्ह्यातील  23 हजार 180 लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

            लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाची जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील "पोस्ट मास्तर" यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट  बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे.  हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडला जाईल.ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही.

               पी.एम.किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्तर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केले असल्याने आयपीपीबी मार्फत दि.01 ते दि.15 मे 2023 या कालावधीत यासाठी गाव पातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे.      

              आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी श्री.संदेश शिर्के यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज