पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन


अलिबाग,दि.29 (जिमाका):-वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या विजेच्या तारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने केले आहे.

             अतिवृष्टी, वादळी पाऊस आदिंमुळे तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीच बोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, इतर साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या विजेच्या तारांवर पडतात. यामध्ये विजेचे खांब वाकतात, विजेच्या तारा तुटतात किंवा लोंबकळत राहतात. अशा तारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने, त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रकार आढळल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधावा.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिग केल्याची खात्री करून घ्यावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी ॲल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावीत. विशेषतः ग्रामीण भागात विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. विजेचे खांब किंवा तारांजवळ कपडे वाळत घालू नयेत.

              वीज ग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल ॲप, www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारेही तक्रारी स्विकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस् कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930 399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल, अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक