विद्यार्थी व शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान

 

             रायगड, दि.20 (जिमाका) :- राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे तसेच शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक पुनिता गुरव यांनी दिली आहे.

 विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिकतंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे, राज्यातून कच-याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे,  विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे ही या अभियानाची मुख्य उद्दिष्टे आहे.

 अभियानाचे स्वरुप :-अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांचे पुढील मुद्दयांच्या आधारे गुणांकन करण्यात येईल. विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन.

 शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग-आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखू मुक्त शाळा, प्लॅस्टिक मुक्त शाळा, शिल्लक अन्नावर योग्य प्रक्रिया, विद्यार्थीकेंद्रित उपक्रमामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था यांचा सहभाग.

तालुकास्तरावरील मुल्यांकनाचे कार्य :- प्राथमिक स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष केंद्रप्रमुख हे आहेत. तालुका स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष गट विकास अधिकारी, पंचायत समिती हे आहेत. जिल्हास्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे आहेत. विभागस्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक हे आहेत. राज्यस्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे हे आहेत.

 पारितोषिके :- पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी सर्व तालुक्यांसाठी एकत्रितपणे रु.01 कोटी 80 लाख एवढ्या रकमेची पारितोषिके आहेत. जिल्हास्तरावर रु. 38 लक्ष एवढ्या रकमेची पारितोषिके आहेत.

000000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज