देश आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना---केंद्रीय मंत्री नारायण राणे
रायगड,दि.15 (जिमाका) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासन समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याबरोबरच देश आत्मनिर्भर करण्यासाठी विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY- G) च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. तसेच पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यनिमित्ताने रायगड जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आ.रविंद्र पाटील, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, प्रकल्प अधिकारी पेण शशिकला अहिरराव, नोडल अधिकारी मुकेश यादव उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री.राणे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांनी मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. गेल्या 9 वर्षात या समाजासाठी 54 योजना राबविण्यात आल्या. समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी वेगवेगळया पातळीवर केंद्र शासनामार्फत विशेष प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक घटकाला न्याय देण्याबरोबरच देशाचा सर्वांगीण विकास करण्यावर प्रधानमंत्री यांचे विशेष लक्ष असल्याचेही श्री.राणे यांनी सांगितले.
यावेळी पीएम जनमन योजनेंतर्गत लाभ दिलेल्या 21 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक लाभाचे वाटप केंद्रीय मंत्री राणे यांच्याहस्ते करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात पीएम जनमन अभियानांतर्गत 1 हजार 896 पक्क्या घरांना मान्यता, 1 हजार 755 घरांना नळपाणी पुरवठा योजनेस मान्यता, 1 हजार 974 घरांपर्यंत विजपुरवठा, 15 वाड्यांमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्त्यांना मंजुरी, कातकरी विद्यार्थ्यांकरीता 3 वसतिगृहांना, कातकरीवाडयांमध्ये 20 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी अंतिम टप्यात, सुधागड तालुक्यातील कातकरी बाड्यांतील लोकांकरीता 15 मोबाईल मेडीकल युनिट तसेच 17 वहुउद्देशीय केंद्रांना व 3 वनधन विकास केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
तसेच आरोग्य विभागामार्फत 58 हजार 248 कातकरी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, 24 हजार 920 कातकरी लाभार्थ्यांचे जनधन खाते, 267 कातकरी लाभार्थ्यांना राशन कार्ड, 646 कातकरी लाभार्थ्यांना पीएम किसान निधी, 578 नवीन आधार कार्ड, 6 हजार 537 -जातीचे दाखले वाटप करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण 596 भागांमध्ये 1 हजार 14 कातकरी वाड्यां असून 1 लाख 81 हजार 973 इतकी लोकसंख्या आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण कार्यालयामार्फत 1 हजार 14 वाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. या लाभार्थ्यांना पक्की घरे, घरांचे विद्युतीकरण, सामुदायिक तसेच नळाद्वारे पाणी पुरवठा, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच वेगवेगळया दाखल्यांचे वाटप सर्व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून 360 मेळावे घेवून करण्यात आले आहे.
००००००००
Comments
Post a Comment