जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी आढावा बैठक संपन्न
रायगड,दि.18(जिमाका):- पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड येथे शैक्षणिक वर्ष 2024 - 25 करिता इयत्ता सहावी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी दि. 20 जानेवारी 2024 रोजी निवड चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक (दि. 16 जानेवारी 2024) रोजी ना.ना. पाटील सभागृह, जिल्हा परिषद, अलिबाग येथे संपन्न झाली.
या बैठकीत विद्यालयाचे प्राचार्य के वाय इंगळे तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रभारी संतोष चिंचकर यांनी सर्व उपस्थित केंद्र प्रमुख मुख्याध्यापक आणि केंद्र स्तरीय निरीक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी वर्ष 2023 च्या तुलनेत वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक सरासरी नोंदणी असलेले केंद्र म्हणून माणगाव तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी सौ. सुनीता खरात यांचा विद्यालयाच्यावतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ही नोंदणी वाढविण्याकरिता माणगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांचे देखील विशेष योगदान नवोदय विद्यालयाला लाभले, त्याकरिता त्यांचे नवोदय विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
या बैठकीत विद्यालयाच्यावतीने सौ प्रभारी उपशिक्षण अधिकारी, अलिबाग.सुनीता चांदोरकर यांचा देखील विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नवोदय विद्यालयाला प्रति वर्षी सदरील प्रवेश परीक्षा घेण्याकरिता ज्यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले आहे, अशा शिक्षणाधिकारी, माध्यमिक, अलिबाग सौ.ज्योत्स्ना शिंदे यांचा देखील या बैठकीत विद्यालयाच्या वतीने आवर्जून उल्लेख करण्यात आला. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने यशस्वीपणे पार पाडण्याकरिता सौ.कोटकर (प्रभारी, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, जिल्हा परिषद ,अलिबाग) यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकीत उपस्थित सर्व केंद्र संचालक आणि केंद्रस्तरीय निरीक्षक यांचे विद्यालयाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांना परीक्षेचे स्वरूप, नियम, विद्यार्थ्यांकरीता करावयाची बैठक व्यवस्था, केंद्रव्यवस्था इत्यादी विषयांची माहिती देण्यात आली.
या बैठकीत केदार केंद्रेकर यांनी निवेदन केले तर शेवटी संजय माने यांनी विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानले.
000000000
Comments
Post a Comment