देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा
रायगड,दि.30 (जिमाका):- विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटी इ द्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषि विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरीता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषि विभागाकडून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटी इ. द्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार सन 2023-24 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झरलैंड, ऑस्ट्रीया, न्यूझीलँड, नेदरलैंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर ई. संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पध्दतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषि उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषि प्रक्रियेमधील अद्ययावत पध्दती यामध्ये आमुलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील योग्य त्या प्रगतशिल शेतकऱ्यांची विविध स्तरावरील समित्यांमार्फत अंतिम निवड करुन परदेशातील आधुनिक कृषि तंत्रज्ञान पाहण्याची संधी त्यांना उपलब्ध करण्यासाठी सदर मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
शेतकरी निवडीचे निकष-अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, स्वतःच्या नावे चालू कालावधीचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे,शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र-1), शेतकरी कुटूंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहलव्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही, सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी (कुटुंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी व 18 वर्षाखालील मुले/मुली), शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे, शेतकरी किमान बारावी पास असावा. बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र अजासोबत जोडणे बंधनकारक आहे.
शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवशी 60 वर्षा पेक्षा जास्त नसावे. (त्यासाठी पारपत्रानुसार वयाची पडताळणी करावी. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान सहा महिने असावी. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाउंटंट), अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-1). शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषि विद्यापीठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-1).
शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे. करोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषी आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग 7-10 दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारिरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.. शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु. 1 लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे.. योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषि विभागामार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याच्या खर्चाचा संपूर्ण 100 टक्के हिस्सा प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक आहे, ही रक्कम शेतकऱ्याने कॅशलेस पध्दतीने त्यांच्या आधार क्रमांकाशी निगडीत स्वतःच्या बँक खात्यातून एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, धनाकर्ष किंवा धनादेशाद्वारे प्रवासी कंपनीस अदा करणे व त्याचा पुरावा कृषी आयुक्तालय कार्यालयास सादर करणे आवश्यक राहील.
दौऱ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर कृषी विभागाशी संपर्क साधून दौऱ्यामध्ये निवड झाल्याचे कृषि विभागाकडून पत्र मिळाल्यानंतरच शेतकऱ्याने दौरा खर्चाची 100 टक्के रक्कम दौरा आयोजित करणाऱ्या कंपनीकडे भरणा करावी. शेतकऱ्यांना देय असलेले 50 टक्के शासकीय अनुदान अभ्यास दौरा पूर्ण करुन परत आल्यानंतर व आवश्यक ती कागदपत्रे (प्रवासाचे विमान तिकीट, बोडींग पास, बँकेचा सविस्तर तपशील इ.) दौऱ्यासोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानंतरच सरळ शेतकऱ्यांच्या नावे बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येईल. शेतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक. मंजूर अभ्यास दौरा दराव्यतिरिक्त परकीय चलनामध्ये होणारी वाढ किंवा घट व यामुळे मंजूर केलेल्या प्रवासी कंपनीच्या स्वीकृत दरामधील फरक देण्यास शासनाने दि.22 फेब्रुवारी 2013 च्या शासन निर्णयानुसार मंजूरी दिली आहे.
ज्या महिन्यात दौरा आयोजित केला जाणार आहे, त्या महिन्यातील एक तारखेस भारतीय रिझर्व्ह बँकेचा विनिमय दर विचारात घेऊन हा फरक प्रवासी कंपन्यांना दिला जाईल. या फरकाच्या रकमेच्या 50 टक्के अनुदान (अधिकतम अनुदान रुपये एक लाखाच्या अधिन राहून) शेतकऱ्यास देय आहे. अशा परिस्थितीत वर नमूद केलेल्या शेतकरी हिश्श्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागेल, त्यानुसार शेतकऱ्याला एकूण प्रवासाची रक्कम प्रवासी कंपनीकडे जमा करावी लागेल. प्रवास दौ-यामध्ये समाविष्ठ केलेल्या बाबीव्यतिरिक्त इतर बाबींवरील खर्च शेतकऱ्याला स्वखर्चाने करावा लागेल. अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
०००००००
Comments
Post a Comment