सर्वात जास्त मतदान करून रायगड जिल्ह्याला मतदानात अग्रेसर करण्याचे आवाहन लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी तरुणाईवर- जिल्हाधिकारी

 

 

रायगड दि.04(जिमाका):- रायगड लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी होत असलेल्या मतदानामध्ये सर्वात जास्त मतदान करून रायगड जिल्ह्याला मतदानात अग्रेसर होण्याचा निर्धार युवक-युवतींनी करावा. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका तरुणाईची आहे, तरुणाईने ठरविले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे येत्या 7 मे रोजी सर्व पात्र मतदारांसह प्रत्येक युवक-युवतीने  मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने हा अधिकार बजाविणे आवश्यक आहे. तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य, आपल्या मित्र-मैत्रिणी यांना मतदानासाठी आग्रह धरून त्यांचे मतदान होईल, यासाठी पाठपुरावा करावा. आपल्या जिल्ह्याला मतदानात नंबर वन बनविण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी केले.

जिल्हा प्रशासन सज्ज

            रायगड लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे.

मतदार यादीत नाव तपासा

            मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्राची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच याच संकेतस्थळावर असलेले क्युआर कोड स्कॅन करुन मतदार यादीत आपले नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी

मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. येत्या 7 मे रोजी मतदान प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन करावे तसेच सर्वांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.

मतदारांनो ही  काळजी घ्या

सध्या तापमान हे 40 अंश से. च्या वरती आहे, त्यामुळे उष्माघात चा धोका लक्षात घेता मतदात्याने मतदान हे शक्यतो सकाळी च्या सत्रात अथवा सायंकाळच्या सत्रात करण्यास प्राधान्य द्यावे. दुपारच्या सत्रात जर जाणार असेल तर टोपी, छत्री व गोगल चा वापर करावा

 

 

मतदानाला जाताना शक्यतो  टोपी, छत्री, गॉगल चा वापर करावा. मतदानाला जाताना जेवण करून अथवा पुरेसा आहार घेऊन जावे. सोबत पाणी बाटली ठेवावी. उच्च रक्तदाब व मधुमेह असलेल्या रुग्णांनी सकाळच्याच सत्रात मतदान करावे.मतदानावरून घरी आल्यावर लगेचच पाणी पिऊ नये,थोडी विश्रांती घेऊन मगच पाणी किंवा लिंबू पाणी प्यावे व थंड पाण्याने हातपाय धुवावे.जर मतदान केंद्रावर उष्णतेचा त्रास होतो आहे असे भासल्यास तात्काळ केंद्रावरील आरोग्य कक्षातील आशा ताई ला भेटून प्रथमोपचार घ्यावा व गरज भासल्यास नजीकच्या दवाखान्यात उपचारास जावे.मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण सर्वांनी नक्की बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक