सामान्य निवडणूक निरीक्षक रुही खान यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी
रायगड जिमाका दि. 6- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघ 192 च्या निवडणूक निरीक्षक (सामान्य) रुही खान यांनी मतदारसंघातील प्रमुख मतदान केंद्रे आणि निवडणूक संबंधित यंत्रणाना आज विस्तृत भेट दिली पाहणी केली आणि आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणे आणि सर्व व्यवस्था भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात याची खात्री करणे हा या भेटीचा उद्देश होता.
निवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या सर्व शाळा, महाविद्यालय यांना त्यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारांसाठी उपलब्ध पायाभूत सोयी आणि सुविधांचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे व्यवस्था केली असल्याची खात्री करून घेतली. विशेषत: दिव्यांग मतदारांसाठी सुलभ व्यवस्थापन याची पाहणी केली. मतदान प्रक्रियेदरम्यान सुव्यवस्था राखण्यासाठी मतदारांसाठी सुरळीत प्रवेश, मार्गदर्शक सूचना, दिशादर्शक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती याबाबत त्यांनी माहिती घेतली. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील ज्या मतदान केंद्रावर 75 टक्के पेक्षा जास्त मतदान होईल त्या बी एल ओ ला विशेष सन्मानित करण्यात येईल असे श्रीमती रुही खान यांनी यावेळी जाहीर केले. तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी निःपक्षपाती आणि सतर्क रहावे असेही स्पष्ट केले आहे.
0000000
Comments
Post a Comment