विधानसभा निवडणूक २०२४ मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

 

 

रायगड(जिमाका)दि.९:- विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास १२ प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती–चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.जावळे यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक