रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये मनाई आदेश जारी

 

रायगड दि.27 (जिमाका):- रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. जुन्या वर्षाची सांगता व नववर्ष आगमनाच्या स्वागताकरिता रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गांवामध्ये हिंदु-मुस्लिम बौध्द तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधून मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिंदु-मुस्लिम व्यक्तींमध्ये जातीय तणावाच्या घडना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे देखील हिंदु-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. पाली पोलीस ठाणे हद्दीत प्राथमिक शाळा आवंढे व अंगणवाडी येथे जाण्या-येण्याच्या रस्त्यात श्री. संपत देशमुख या व्यक्तीने अनाधिकृतपणे कंपाऊन्ड टाकून रस्ता बंद केला आहे. सदर कपाऊन्ड तोडून रस्ता मोकळा करण्यात यावा अन्यथा दि.06 जानेवारी 2025 रोजी सचिन गोपाल झुंजारराव हे पंचायत समिती कार्यालय पाली येथे उपोषण करणार आहेत. भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था सर्व प्रकल्पग्रस्त आय.पी.सी.एल/रिलायन्स नागोठणे कंपनी मध्ये कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहील्याने तसेच प्रलंबित विषयी न्यायाची निर्णायक संयुक्त बैठक घेण्यात येत नसल्याने दि.01 जानेवारी 2025 रोजीपासून भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त गंगाराम मिणमीने, सुरेश महादेव कोकाटे, रा.पेण हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. खालापूर पोलीस ठाणे हद्दीत  सचिन अनंता पाटील, मंदार भगवान पाटील व वासुदेव गोविंद पाटील हे प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या वारसांना पाताळगंगा एमआयडीसी, ता.खालापूर या कंपनीत कायमस्वरूपी नोकरीत न घेतल्यास दि.30 डिसेंबर 2024 रोजी कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करणार आहेत. कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील सौ.मिना कमलेश ठाकरे यांच्या वडीलोपार्जीत जमीनीवर केलेले बांधकाम ग्रामविकास अधिकारी व प्रशासक अधिकारी यांनी कोणतेही पुरावे नसताना मनमानी करून ते बांधकाम काढून टाकले आहे. या अन्यायाविरोधात दि.30 डिसेंबर 2024 रोजीपासून सहकुटुंब कर्जत प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार आहेत. न्याय न मिळाल्याने आत्मदहन करणार आहेत. खालापूर तहसिलदार अभय चव्हाण यांना के.पी.न्यूज चैनलचे संपादक फिरोज पिंजारी यांनी बातमी प्रकाशित केल्याबाबत नोटीस बजावत कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ही बातमी खोटी होती का पत्रकारिता कोर्स केल्यानंतरही 15 चा वर्षाचा अनुभव असूनही पोर्टल, ब्लॉगस्पॉट, युट्युब चैनल अथवा डिजिटल प्रसार माध्यम चालवायला कोणकोणत्या परवानग्या लागतात याची लेखी सविस्तर माहिती निवेदन दिल्यापासून 30 दिवसात प्राप्त न झाल्यास दि.06 जानेवारी 2025 रोजी खालापूर तहसिल कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत.

सर्व परिस्थिती लक्षात घेता, नमूद औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित राहावी. तसेच सण उत्सव व राजकीय परिस्थिती आंदोलन/उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि.27 डिसेंबर 2024 रोजी 00.01 ते दि.10 जानेवारी 2025 रोजीचे 24.00 वाजेपर्यत या कालावधीकरीता मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) मधील (अ), (ब), (क), (ड), (ई) व (फ) प्रमाणे खालील कृत्ये करण्यास  जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मनाई आदेश जारी केला आहे.

शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुरे काठया किंवा लाठ्या अगर शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे.  अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, जमा करणे किंवातयार करणे. व्यक्ती, प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे,ई) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे. सभ्यता अगर निती याविरुध्द असतील अशी जिल्हयाची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा हावभाव करणे किंवा सोंग करणे, चित्र, चिन्ते अगर कोणतीही तत्सम वस्तू, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय पाच अगर पाचाहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकीस मनाई राहील.

तसेच ही अधिसूचना वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा शासकीय अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्यरितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही. ही अधिसूचना खऱ्या प्रेत यात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर शासकीय समारंभासाठी लागू नाही. तथापि, सदर कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणूका इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात येत आहेत. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता धोक्यात येणार नाही याची जबाबदारी आयोजकांवर राहील, या अटीवर परवानगी द्यावी.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज