छत्रपतींच्या जयघोषात, शिवमय वातावरणात भव्य व दिमाखदार “जय शिवाजी जय भारत”पदयात्रा संपन्न

 


 

रायगड(जिमाका)दि.19:-  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'जय शिवाजी, जय भवानी',  'हर हर महादेव' जय शिवाजी जय भारत अशा जयघोषात आज रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित भव्य जय शिवाजी जय भारत पद यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या या जिल्ह्यात या पदयात्रेचे अतिशय दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान  येथून जय शिवाजी जय भारतपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान अलिबाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण पुढे न्यायची आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला.

छत्रपतींच्या वेशभूषेतील विद्यार्थी, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थींनी या पदयात्रेत लक्ष वेधून घेत होत्या. ही पदयात्रा पोलीस कवायत मैदान अलिबाग येथून वरसोली बीच रस्तामार्गे विठ्ठल मंदिर वरसोली कडून मांडवा अलिबाग मार्गावरुन रायगड बाजार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराज चौकात शालेय विद्यार्थांनी विविध मैदानी खेळ, पारंपारिक नृत्य, पोवाड गायन अशा विविध कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  

विद्यार्थ्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांचा पेहराव आणि पदयात्रेतील सहभागी विद्यार्थिनींनी केलेला पारंपरिक पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेता होता.  छत्रपतींच्या जयघोषात निघालेल्या या पदयात्रेने वातावरण शिवमय बनले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी पदयात्रा यशस्वी केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, अधिकाऱ्यांसह सहभागी सर्वांचे आभार व्यक्त केले.

पदयात्रेमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, तहसिलदार विक्रम पाटील, तहसिलदार (महसूल ) चंद्रसेन पवार यांच्यासह अलिबाग तालुक्यातील सर्व माध्यमिक, प्राथमिक हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थींनी तसेच एनसीसी, स्काऊट गाईड चे हजारो विद्यार्थी,  विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

शिवचरित्र सर्वाचा आदर, सन्मान करण्याची प्रेरणा देते-श्रीमंत कोकाटे

 

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूचेच नव्हे, तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे. रयतेच्या हिताला प्राधान्य आणि सर्वाचा आदर, सन्मान करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच आपल्याला देत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.

रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय शिवाजी जय भारत पदयात्रा निमित्ताने ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री.कोकाटे यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याचा, शौर्याचा इतिहास सांगितला.  छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांनी शिरसावंद्य मानला.  महत्त्वाच्या घटनाप्रसंगी जिजाऊसाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तोरणा किल्ला जिंकणे, अफजलखानाचा वध, आग्रा येथून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, राज्याभिषेक इत्यादी प्रसंगी शिवाजीराजांनी जिजाऊसाहेबांचा सल्ला घेतला असेही श्री.कोकाटे यांनी सांगितले.

आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, असे धोरण शिवाजी महाराज कटाक्षाने राबवत असत. शिवरायांचे शेतकरी धोरण हे शेतकरीप्रधान होते. या सर्व बाबी त्यांच्या प्रागतिक विचारांच्या साक्षीदार आहेत. छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून आधुनिक लोकशाहीचा पाया रचला. सर्वधर्म समभाव, समता, संवेदनशीलता, मानवता, आपत्ती व्यवस्थापन यामध्ये त्यांनी आदर्श घालून दिला आहे. शिवकाळात अत्याधुनिक साधने नसताना अशक्य कार्य त्यांनी शक्य करून दाखविले ते केवळ कर्तृत्वाच्या आणि प्रागतिक विचारांच्या बळावर असेही श्री.कोकाटे यांनी सांगितले.

000000

Comments

  1. Fast approval and delivery to my doorstep—superb service!
    Hsrp

    ReplyDelete
  2. HSRP booking that is super fast, secure, and easy!
    Hsrp

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज