सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी
रायगड,दि.25(जिमाका):-सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची (शिधापत्रिकाधारक) ई- केवायसी असणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. लाभार्थ्यांचे शिधापत्रिकासोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद असलेली व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड सर्जेराव सोनावणे यांनी केले आहे.
शिधापत्रिकांसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांकाचे प्रमाणिकर पूर्ण करण्यासाठी व रास्तभाव दुकानस्तरावर ई-केवासयी मोहिम राबविण्यात येत आहे. शासनाचे निर्देशान्वये धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांची 100 टक्के ई-केवायसी करण्याबाबत सुचित केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये 75.72 टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. शासनाच्या पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांची ई-केवायसी करण्यासाठी शासनाने दिलेली मुदतवाढ 30 जून रोजी संपली आहे. यापुढे ई-केवायसी करण्याकरिता शासनाकडून मुदतवाढ मिळणार नाही.
अद्यापही ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याकरिता आपण धान्य घेत असलेल्या नजिकच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये जावून ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. तसेच अनेक शिधापत्रिकाधारकांचे अंगठे ई-पॉस मशीनवर स्कॅन होत नव्हते, यामुळे आता या शिधापत्रिकाधारकांचे ई-पॉस मशीनवर डोळे स्कॅन करुन (IRIS Scanner चा वापर करुन) ई- केवायसी प्रक्रीया पुर्ण करता येत आहे. तसेच ई-केवायसी करण्याकरिता Mera eKYC हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन त्याद्वारे देखील KYC करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पुढील 1 महिन्यात ई-केवायसी न केल्यास आपल्या शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थी यांची राहील.
००००००
Comments
Post a Comment