एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह --जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड जिमाका,दि.31-- महसूल विभागाच्या वतीने राज्यात एक ऑगस्ट रोजी 'महसूल दिन 'साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा सप्ताह शुक्रवार (दि.1) ते गुरुवार (दि. 7 ऑगस्ट) दरम्यान असणार आहे. या सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
महसूल सप्ताह
1 ऑगस्ट रोजी 'महसूल दिना'निमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि निवृत्त महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार होईल. याच दिवशी विविध प्रमाणपत्रांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते केले जाईल.
2 ऑगस्ट: अतिक्रमण नियमानुकूल करणार
31 डिसेंबर 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत.
3 ऑगस्ट: शेत रस्त्यांचे वाद मिटवणार
'पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना' अंतर्गत पाणंद आणि शिवपांदण रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन अपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता मिळेल आणि त्यांना क्रमांक दिले जातील. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण होईल, आणि झाडे तोडल्यास वनविभागाच्या कायद्यांतर्गत कारवाई होईल.
4 ऑगस्ट: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान
महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन होऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. आधार कार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, अधिवास, जात, उत्पन्न आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप होईल. वर्षातून चार वेळा अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
5 ऑगस्ट: डिबिटी अडचणी दूर करणार
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डिबिटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तलाठी घरोघरी भेटी देतील आणि आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील.
6 ऑगस्ट: शर्तभंग जमिनी परत घेणार
शासकीय जमिनींच्या शर्तभंग प्रकरणांचे सर्वेक्षण होऊन अतिक्रमण किंवा शर्तभंग आढळल्यास त्या जमिनी शासनाकडे परत घेतल्या जाणार आहेत.
7 ऑगस्ट: एम सँड धोरण आणि सांगता समारंभ
कृत्रिम वाळू (M-Sand) धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा आणि शिबिरांचे आयोजन होईल. 17 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार मानक कार्यप्रणाली (SOP) अवलंबली जाईल. महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित होऊन उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली जाईल.
00000
.jpeg)
Comments
Post a Comment