खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती
रायगड (जिमाका), दि.14 :- खोपोली येथे (दि.12 सप्टेंबर) रोजी विशेष वित्तीय समावेशन शिबिर कार्यक्रम संपन्न झाले. या शिबिरांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक नीरज निगम, प्रादेशिक निर्देशक (मुंबई) सुमन रे, बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्य महाप्रबंधक दिनकर संकपाळ, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक सुनील शर्मा, युनियन बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक दिलीप मिश्रा, बँक ऑफ बडोदा बँकेचे महाप्रबंधक सुनील कुमार शर्मा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे रिजनल मॅनेजर विभोर अग्रवाल, बँक ऑफ इंडिया च्या रायगड विभाग प्रमुख श्रीमती दीपन्विता सहानी, स्टेट बँक ऑफ इंडिया चे उप महाप्रबंधक दया शंकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या शिबिरामध्ये खोपोली आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला बचतगट, लघुउद्योग प्रतिनिधी आदींना खाते उघडणी, पुनःकेवायसी (Re-KYC) प्रक्रिया, पीएम जनधन योजना, सामाजिक सुरक्षा विमा योजना, मुद्रा कर्ज योजना, डिजिटल व्यवहार, तसेच डिजिटल फ्रॉड विषयी मार्गदर्शन तसेच विविध बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
प्रमुख पाहुणे नीरज निगम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “वित्तीय समावेशन ही सर्वांगीण आर्थिक विकासाची किल्ली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने बँकिंग प्रणालीशी जोडले जाऊन तिच्या सुविधांचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर सर्व ग्राहकांनी आपल्या खात्याचे पुनर्जीवन वेळेत करून घ्यावे व सरकारकडून मिळणाऱ्या थेट लाभाचा फायदा करून घ्यावा. तसेच डिजिटल व्यवहार करताना आवश्यक सुरक्षा उपायांचे महत्त्व अधोरेखित केले व वित्तीय साक्षरतेसाठी अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी यांना दिले.
बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक सुनील कुमार शर्मा यांनी कोणत्या खात्यामध्ये री केवायसी करणे जरुरी आहे तसेच री केवायसी करण्याचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र बँकेचे मुख्य महाप्रबंधक दिनकर सकपाळ यांनी जनधन खाते,रुपये कार्ड, खात्याला वारस लावण्याचे महत्व आणि फायदे तसेच आर्थिक शिस्त याविषयी मार्गदर्शन केले.
बँक ऑफ बरोडा चे महाप्रबंधक सुनीलकुमार शर्मा यांनी सामाजिक सुरक्षा योजना जसे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, जीवन ज्योती बीमा योजना याबद्दल विस्तृत माहिती दिली.
युनियन बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक दीपक मिश्रा यांनी वाढते डिजिटल फ्रॉड याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.या शिबिरामध्ये विविध बँकांचे 12 स्टॉल लावण्यात आले होते. शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 1 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी तत्काळ आवश्यक अर्ज व प्रक्रिया पूर्ण करून योजनांचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिझर्व बँकेच्या उप महाप्रबंधक डॉ.ज्योती सक्सेना यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिझर्व बँकेचे रायगडचे अधिकारी विशाल गोंदके यांनी केले. प्रबंधक जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी उपस्थिचांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खोपोली शहरातील सर्व सरकारी आणि खाजगी बँका मधील तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक मधील सर्व अधिकारी, स्टाफ यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी खोपोली शहरातील सर्व बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment