महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ संपन्न
रायगड-अलिबाग,दि.17(जिमाका):- गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा करण्यात आली असून जिल्ह्यात हे अभियान दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ पळस्पे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या ग्रामसभेस उपस्थित राहून ग्रामस्थांसोबत संवाद साधून महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी नेहा भोसले, गटविकास अधिकारी पनवेल समीर वाठारकर यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच महिला बचतगटाच्या महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान आजपासून संपूर्ण राज्यात सुरु होत आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व सर्व ग्रामस्थांनी मिळून यशस्वी प्रयत्न करावेत व सर्वोत्तम कामगिरी करावी. या अभियानांतर्गत राज्य शासनाने ग्रामपंचायतींना विविध विकासकामांमध्ये स्पर्धा करण्याची संधी देत लाखो रुपयांच्या पारितोषिकांची घोषणा केली आहे. ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकासाठी 15 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 12 लाख, तर तृतीय क्रमांकासाठी 8 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर देखील स्वतंत्र बक्षिसे देण्यात येतील. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर 2025 या कालावधीत हा उपक्रम राबवला जाणार आहे. अभियानाचे उद्दिष्ट ग्रामपातळीवर सुशासनयुक्त आणि सक्षम पंचायत उभारणे, जल समृद्धी, स्वच्छ व हरित गाव निर्मिती, सरकारी योजनांचा प्रभावी अंमल, लोकसहभाग वाढविणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे आहे. पळस्पे ग्रामपंचायतीने राज्यातील पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवावे,अशी अपेक्षा त्यांनी योवळी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या या ग्रामपंचायतीत अनेक विकासकामे होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या. गटविकास अधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेण्याचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले.
या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाईल त्यावेळी रायगड जिल्ह्यातील किमान तीन ग्रामपंचायती राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्ता असल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. हा राज्यस्तरीय शुभारंभ पळस्पे ग्रामपंचायतीत दूरदृश्यप्रणालीद्वारे दाखवण्यात आला. बचत गटांनी लावलेल्या विविध उपक्रमांच्या स्टॉलना कु.तटकरे यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले.
.jpeg)
Comments
Post a Comment