महाविस्तार अॅपचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

 

रायगड-अलिबाग,दि.18(जिमाका):- शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी एक नवीन अॅप सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र असे या अॅप विषयी वर्णन केले जाते. आपल्या शेतकरी बांधवांना आता या एका अॅपमध्येच शेती विषयक योजनाविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान विषयक माहिती, पीक सल्ला पिकासाठी लागणारी खताची मात्रा, कीड व रोगाविषयी माहिती तसेच तुम्ही पिकविलेल्या मालाचा बाजारभावही बघता येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी दिली आहे.

    अगदी एका क्लिकवर शेतीसाठी लागणारी यंत्र अवजारे भाडेतत्त्वावर मिळविण्याकरिता त्यांच्या गावाच्या जवळपास असणाऱ्या अवजारे बँकांची माहिती देखील या अॅपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व महाडीबीटीवर असणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती अर्थात त्यातील विविध घटकाकरिता अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती या अॅपमध्ये समाविष्ट आहे. ऑनलाईन शेती शाळा नवनवीन तंत्रज्ञानाचे व्हिडिओ देखील या अॅपच्या माध्यमातून शेतकरी बंधू बघू शकतात.

    याकरिता शेतकरी बांधवांनी प्ले स्टोअर वरुन महाविस्तार अॅप डाऊनलोड करुन घ्यावा. त्यानंतर आपल्या शेतकरी आयडीने लॉगईन करुन आपले नाव, गाव, तालुका प्रविष्ठ करायचा आहे. जेणेकरून त्यांची गावनिहाय, तालुकानिहाय सर्व माहिती त्यांना उपलब्ध होईल. अॅपच्या होम पेजवर शेतकऱ्यांना सर्व माहिती उपलब्ध होईल तसेच नवनवीन गोष्टीविषयी किंवा शेतकरी बांधवांच्या मनात येणाऱ्या शंका व त्याचे विविध प्रश्न हे ते अॅप मध्ये असणाऱ्या "मला प्रश्न विचारा" येथे जाऊन आपल्या शंकांचे निराकरण करु शकतात.

    अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीविषयक एक सोबती, मित्र आता त्यांच्या मोबाईल मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, याचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. या अॅप विषयीच्या अधिक माहितीकरीता जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत