जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरूवात


रायगड-अलिबाग, दि.24 (जिमाका) :-जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींमध्ये या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

 

या मोहिमेअंतर्गत गुरुवार, दि.25 सप्टेंबर रोजी ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’ या उपक्रमांतर्गत सकाळी 8 ते 10 या वेळेत प्रत्येक गावात प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. या वेळी अस्वच्छता असलेली ठिकाणे, कार्यालये, संस्थात्मक इमारती, पर्यटनस्थळे, धार्मिक व आध्यात्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू, नदीकिनारे, समुद्रकिनारे, प्रमुख रस्ते व उद्याने आदींची स्वच्छता करण्यात येईल.

या अभियानात लोकप्रतिनिधी,स्वच्छता प्रेमी नागरिक,  युवक मंडळे, अधिकारी व कर्मचारी, एन.एस.एस. स्वयंसेवक, विविध संस्था प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्वच्छता करून जमा झालेला कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावला जाणार आहे. यासोबतच वृक्षारोपण, कोपरा बागांची निर्मिती, सुशोभीकरण तसेच सामुदायिक स्वच्छता शपथ घेणे अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच दि.26 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक तास स्वच्छता प्रबोधन संवाद कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, शौचालयाचा नियमित वापर आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत देण्यात आली आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत